अमेरिकेची एफ-३५बी विमानातून स्टॉर्मब्रेकर ग्लाईड बॉम्बची चाचणी

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या मरिन कॉर्प्सने एफ-३५बी या स्टेल्थ विमानातून ‘स्टॉर्मब्रेकर ग्लाईड बॉम्ब’ची यशस्वी चाचणी केली. विमानातून प्रक्षेपित केल्यानंतर स्टॉर्मब्रेकर आपले पंख पसरुन ६४ किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकते. त्यामुळे शत्रूच्या हवाई सुरक्षा यंत्रणेच्या कक्षेत प्रवेश न करताच हल्ला चढविता येऊ शकतो, असा दावा अमेरिकन सुरक्षा यंत्रणा करीत आहेत.

अमेरिकन हवाईदल, नौदल आणि रेदॉन मिसाईल अँड डिफेन्स या कंपनीने अमेरिकेच्या अतिप्रगत लढाऊ विमानांना अत्याधुनिक बॉम्बने सज्ज करीत आहेत. अमेरिकन हवाईदलाचे ‘एफ-१५ई स्ट्राईक इगल’ अतिप्रगत विमान स्टॉर्मब्रेकर ग्लाईड बॉम्ब याआधीच सज्ज केले होते. पण अमेरिकेचे नौदल आणि मरिन कॉर्प्स देखील स्टॉर्मब्रेकरला सामील करून घेण्याच्या तयारीत आहेत.

गेल्या आठवड्यात मेरिलँड येथील नौदलाच्या हवाईतळावर एफ-३५बी या पाचव्या श्रेणीतील स्टेल्थ लढाऊ विमानातून या बॉम्बची चाचणी घेण्यात आली. कुठल्याही हवामानात स्टॉर्मब्रेकर शत्रूच्या वेगवान लढाऊ विमाने, ड्रोन्स, क्षेपणास्त्रांचा हवेतच ठाव घेऊ शकते, असा दावा अमेरिकेकडून केला जातो. यामुळे एफ-३५बीच्या क्षमतेत वाढ झाल्याचे अमेरिकन मरिन कॉर्प्सचे म्हणणे आहे.

एफ-३५बी स्टेल्थ विमाने अमेरिकन नौदल आणि मरिन कॉर्प्सकडून वापरली जातात. अमेरिकेच्या विमानवाहू आणि ऍम्फिबियस युद्धनौकांवर ही विमाने तैनात असतात. या विमानांना अत्याधुनिक बॉम्बनी सज्ज करण्यासाठी अमेरिकन नौदलाचे प्रयत्न सुरू आहेत. एफ-३५बीनंतर लवकरच अमेरिकेचे नौदल एफ/ए-१८/एफ सुपर हॉर्नेट या विमानांना देखील स्टॉर्मब्रेकर ग्लाईड बॉम्बने सज्ज करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

leave a reply