युएईच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी इराणच्या राष्ट्रध्यक्षांची भेट घेतली

तेहरान – युएईचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ‘शेख तहनून बिन झायद अल नह्यान’ यांनी इराणचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांची भेट घेतली. इराण, या देशाचा अणुकार्यक्रम व दहशतवाद आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे, अशी चिंता अरब देश गेली काही वर्षे व्यक्त करीत आहेत. तर इस्रायलबरोबर अब्राहम करारात सहभागी होणार्‍या युएईला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे इराणने काही महिन्यांपूर्वी धमकावले होते. अशा परिस्थितीत, युएईच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची ही इराण भेट लक्षवेधी ठरते.

युएईच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी इराणच्या राष्ट्रध्यक्षांची भेट घेतलीशेख तहनून बिन झायद यांनी सोमवारी इराणचे राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख अली शामखानी यांची भेट घेतली. यात युएई व इराणमधील द्विपक्षीय सहकार्य तसेच क्षेत्रीय मुद्यांवर चर्चा पार पडली. युएई आणि इराणमध्ये मैत्रीपूर्ण सहकार्य प्रस्थापित करणे, हे युएईच्या प्राधान्यक्रमावर असल्याचे शेख तहनून यांनी सांगितले. याबाबतचे अधिक तपशील समोर आलेले नाहीत.

शेख तहनून हे युएईचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायद यांचे सख्खे बंधू आहेत. गेली काही वर्षे शेख तहनून युएईचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. गेल्या वर्षी इस्रायलबरोबर झालेल्या अब्राहम करारांतर्गत सहकार्य प्रस्थापित झाल्यानंतर शेख तहनून यांनी इस्रायली गुप्तचर संस्था ‘मोसाद’च्या प्रमुखांची भेट घेतली होती. अशा परिस्थितीत, शेख तहनून यांची इराण भेट म्हणजे आखातातील राजकीय हालचाली अधिकच तीव्र बनल्याचे दाखवून देत आहे.

leave a reply