भारतीय कंपनीकडून ‘३डी’ प्रिन्टेड रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली/बंगळुरू – तमिळनाडूतील ‘अग्नीकुल कॉसमॉस’ ही स्टार्टअप कंपनी ३डी प्रिन्टेड रॉकेट इंजिनची चाचणी घेणारी जगातील पहिली कंपनी ठरल्याचा दावा केला जातो. ही चाचणी यशस्वी ठरली आहे. हे ३डी इंजिन तयार करण्यासाठी केवळ चार दिवस लागले असून पृथ्वीच्या सर्वात खालच्या कक्षेत १०० किलो इतके पेलोड घेऊन जाण्यास सक्षम असल्याचा दावा या कंपनीने केला आहे.

या इंजिनला ‘अग्नीलेट’ असे नाव देण्यात आले आहे. ३डी प्रिन्टेड इंजिनच्या या चाचणीचे वृत्त येत असतानाच हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (हल) आणि ‘विप्रो३डी’ कंपनीमध्ये ३डी प्रिन्टेड विमान इंजिनाचे भाग बनविण्यासाठी करार झाल्याचेही वृत्त आहे.

भारतात अंतराळ उद्योग क्षेत्रात खाजगी कंपन्या झपाट्याने पावले टाकत आहेत. तसेच या क्षेत्रात परकीय गुंतवणुकही येत आहे. गेल्यावर्षी केंद्र सरकारने अंतराळ क्षेत्र खाजगी गुंतवणुकदारांसाठी खुले करण्याचा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला होता.

‘अग्नीकुल’ या रॉकेट निर्माती भारतीय स्टार्टअप कंपनीने गेल्यावर्षी अमेरिकी कंपनी अलास्का एरोस्पेस कॉर्पोरेशन बरोबर करार केला होता. आता या कंपनीने ‘३डी’ प्रिन्टींग तंत्रज्ञानाचा वापर करून रॉकेट इंजिन बनविले आहे. हे ‘वन पीस इंजिन’ असल्याची माहिती या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनाथ रामचंद्रन यांनी दिली.

जगभरात ३डी प्रिन्टेड इंजिनचे प्रयोग चालू आहेत. याद्वारे काही इंजिन्स बनविण्यातही आली आहेत. मात्र भारतीय कंपनीने घेतलेली चाचणी ही जगातील कोणत्याही ३डी प्रिन्टेड रॉकेट इंजिनची पहिली चाचणी आहे. त्यामुळे ‘अग्नीलेट’ इंजिनच्या यशस्वी चाचणी या क्षेत्रात नवी दालन उघडणारी ठरणार आहे.

या इंजिनाची क्षमात १०० किलो पेलोड विमान किंवा प्रक्षेपकाला घेऊन जाण्याची आहे. पृथ्वीच्या कक्षेत ७०० किलोमीटरपर्यंत १०० किलो इतके पेलोड हे इंजिन वाहून नेऊ शकेल. त्यामुळे पुढील काळात उपग्रह प्रक्षेपणासाठी रॉकेट प्रक्षेपक वाहनाकरीता या इंजिनाचा वापर करता येईल.

दरम्यान, ‘हल’ आणि ‘विप्रो३डी’ कंपनीमध्ये ‘३डी’ प्रिन्टेड विमान इंजिनाचे भाग तयार करण्यासाठी महत्वाचा करार पार पडला आहे. हलकडून निर्मिती केल्या जात असलेल्या हेलिकॉटर्स इंजिनासाठीही ‘३डी’ प्रिन्टेड सुट्टे भाग वापरण्यात येतील अशा बातम्या आहेत. ‘हल’ आणि ‘विप्रो३डी’ने असे सुट्टे भाग यशस्वीरित्या विकसित केले आहेत. हा करार त्याच्या उत्पादनासाठी असल्याचे वृत्त आहे.

leave a reply