अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-पी’ बॅलेस्टिक क्षेत्रणास्त्राची चाचणी यशस्वी

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून संशोधकांचे अभिनंदन

बालासोर – अग्नी-१ आणि अग्नी-२ या क्षेपणास्त्रांची अद्ययावत आवृत्ती असणार्‍या ‘अग्नी-प्राईम’ मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी ठरली आहे. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास ओडिशातील बालासोर येथील अब्दुल कलाम बेटावरील डीआरडीओच्या प्रक्षेपण तळावरून ही चाचणी घेण्यात आली. अग्नी श्रेणीतील इतर क्षेपणास्त्रांपेक्षा आकाराने लहान व वजनाने हलके असलेले ‘अग्नी-पी’ हे क्षेपणास्त्र सहजगत्या रेल्वे व कंटेनरमधून रस्तेमार्गाने नेता येते. तसेच या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राद्वारे इंडो-पॅसिफीक क्षेत्रातील युद्धनौकांचा वेध घेणे सोपे होणार आहे. या क्षेत्रातील चीनच्या हालचाली पाहता व्युहरचनात्मकदृष्ट्या हे क्षेपणास्त्र अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ‘अग्नी-पी’ची चाचणी यशस्वी ठरल्यानंतर डीआरडीओच्या संशोधकांचे अभिनंदन केले आहे.

अण्वस्त्रवाहू ‘अग्नी-पी’ बॅलेस्टिक क्षेत्रणास्त्राची चाचणी यशस्वी - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून संशोधकांचे अभिनंदनअग्नी श्रेणीत भारताने आतापर्यंत सहा क्षेपणास्त्र विकसित केली असून अग्नी-६ या क्षेपणास्त्रावर काम सुरू आहे. दिड महिन्यांपूर्वीच भारताने पाच हजार किलोमीटर इतकी मारक क्षमता असलेल्या अग्नी-५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. तर शनिवारी ‘अग्नी-प्राईम’ची (अग्नी पी) चाचणी झाली आहे. ‘अग्नी-पी’ हे मध्यम पल्ल्याचे सुपरसॉनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता एक ते दोन हजार किलोमीटर इतकी आहे.

भारताच्या अग्नी कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात डीआरडीओने अग्नी-१ आणि अग्नी-२ ही बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विकसित केली होती. ही क्षेपणास्त्र सध्या लष्करात दाखल आहेत. याच दोन क्षेपणास्त्रांची ‘अग्नी-पी’ ही प्रगत आवृत्ती आहे. अग्नी-१ आणि अग्नी-२ च्या तुलतेन या क्षेपणास्त्राची मारक क्षमता वाढली आहेच. याशिवाय अग्नी-३, अग्नी-४ आणि अग्नी-५ या क्षेपणास्त्रांतील प्रगत तंत्रज्ञानाचा वापर ‘अग्नी-पी’मध्ये करण्यात आला आहे. याशिवाय इतरही नव्या तंत्रज्ञानाची जोड ‘अग्नी-पी’ला देण्यात आली आहे. ‘अग्नी-पी’मध्ये ड्युअल रेड्युनन्ट नेव्हिगेशन आणि गाईडन्स प्रणालीसह टू -स्टेज कॅनिस्टराइज्ड सॉलिड प्रोपेलंट यासारखे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.

याशिवाय हे क्षेपणास्त्र अग्नी श्रेणीतील इतर क्षेपणास्त्रापेक्षा आकाराने लहान आणि हलके आहे. त्यामुळे सहज कुठेही नेता येऊ शकते. विशेषत: इंडो-पॅसिफीक क्षेत्रात आव्हानांचा विचार करून ‘अग्नी-पी’ विकसित करण्यात आल्याचा दावा केला जातो. चीनकडून या क्षेत्रातील कारवाया आणि वर्चस्वाची महत्त्वाकांक्षा पाहता संघर्ष भडकल्यास या आघाडीवर चीनच्या योजना उद्ध्वस्त करू शकेल, अशा क्षेपणास्त्रांची भारताला आवश्यकता होती. यामुळे ‘अग्नी-पी’ विकसित करण्यात आले.

हे क्षेपणास्त्र सागरातील धोक्यांचा अचून वेध घेऊ शकते. चीन आपल्या नौदलाची ताकद वाढवित आहे. चीन आपल्या नौदलाच्या ताफ्यात पुढील काही वर्षात सहा विमानवाहू युद्धनौका दाखल करून घेण्याच्या तयारीत आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताने विकसित केलेल्या ‘अग्नी-पी’चे महत्त्व लक्षात येईल. हे क्षेपणास्त्र लवकरात लवकर संरक्षणदलांच्या ताफ्यात दाखल करून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे जून महिन्यात क्षेपणास्त्राची पहिली चाचणी झाल्यावर सहा महिन्याच्या आत दुसरी चाचणी घेण्यात आली आहे. या चाचणीत लक्षीत मापदंड पूर्ण केले आहेत. यासाठी रडार, युद्धनौका आणि दळणवळण यंत्रणेद्वारे या चाचणीकडे बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते.

‘अग्नी-पी’च्या दुसर्‍या चाचणीच्या यशानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओच्या संशोधकांचे अभिनंदन केले आहे. तसेच डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी यांनीही विविध अतिरिक्त वैशिष्ट्यांसह दुसरी अत्याधुनिक उड्डाण चाचणी यशस्वी करणार्‍या संशोधकांच्या पथकाचे कौतुक केले आणि यावर्षात सलग यश मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

leave a reply