भारत-ब्रिटनमध्ये पुढील महिन्यात ‘एफटीए’साठी वाटाघाटी सुरू होणार

- वाणिज्यमंत्री पियुष गोयल

नवी दिल्ली – भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारावर (एफटीए) पुढील महिन्यात वाटाघाटी सुरू होऊ शकतात, अशी महत्त्वपूर्ण माहिती वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. याशिवाय कॅनडाबरोबरही एफटीएसाठी मार्चपर्यंत वाटाघाटी सुरू होण्याची शक्यता गोयल यांनी वर्तविली. गोल्फ कोऑपरेशन काऊंन्सिलचे (जीसीसी) सदस्य देश भारताबरोबर व्यापार करार करण्यास उत्सुक असून या देशांच्या वतीने जीसीसीने भारताशी संपर्क केल्याचेही वाणिज्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.

भारत-ब्रिटनमध्ये पुढील महिन्यात ‘एफटीए’साठी वाटाघाटी सुरू होणार - वाणिज्यमंत्री पियुष गोयलकोरोनाचे संकट, ब्रेक्झिट आणि विस्कळीत झालेल्या पुरवठा साखळीच्या पाश्‍वर्र्भूमीवर नव्या आर्थिक आघाड्या बनत असून कित्येक देश नव्या बाजारपेठा शोधत आहे. भारताची बाजारपेठ या देशांना खुणावत आहे. भारताला विविध देशांबरोबर आपले व्यापारी सहकार्य वाढविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतानेही विविध देशांबरोबर मुक्त व्यापार करून व्यापारवाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नुकतेच युएईबरोबर एफटीए कराराला अंतिम रुप देण्याचे काम सुरू झाल्याचे वृत्त आले होते. तर शुक्रवारी फिक्की या उद्योजकांच्या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी पुढील महिन्यात ब्रिटनबरोबरही वाटाघाटी सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे.

भारत आणि ब्रिटनमध्ये व्यापाराच्या अमाप संधी उपलब्ध असून त्यांच संधीचा लाभ घेण्यासाठी व्यापारी भागिदार म्हणून दोन्ही देश अधिक जवळ येत आहेत, असे गोयल म्हणाले. तसेच कॅनडाबरोबर मार्च किंवा एप्रिलमध्ये एफटीएबाबत चर्चा सुरू होईल, अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली. याशिवाय गोल्फ कोऑपरेशन काऊंन्सिलने (जीसीसी) सदस्य देशांच्या वतीने भारताबरोबर व्यापार करार करण्यासाठी संपर्क सधाला आहे व या देशांच्या वतीने जीसीसी लवकरच भारताबरोबर वाटाघाटीला सुरू करील, असेही गोयल म्हणाले. सौदी अरेबिया, युएई, कतार, ओमान, कुवेत, बाहरिन हे देश जीसीसी सदस्य आहेत. यामध्ये युएईने आधीच भारताबरोबर चर्चा सुरू केली होती व तिसर्‍या टप्प्यातील वाटाघाटी पूर्ण होऊन कराराला अंतिम स्वरुप देण्याचे काम सुरू झाले आहे, याकडे गोयल यांनी लक्ष वेधले.

भारत सध्या सहा देशांबरोबर एकाच वेळी एफटीएसाठी वाटाघाटी करीत आहे व पुढील काही दिवसात यामध्ये आणखी काही देशांचा समावेश होईल, ही बाब वाणिज्यमंत्र्यांनी अधोरेखित केली. ऑस्ट्रेलियाबरोबरील चर्चा पुढील टप्प्यात पोहोचली आहे, तर ब्रिटनमधीलही पुढील टप्प्यातील चर्चा महिनाभरात सुरू होईल, असे गोयल म्हणाले.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ब्रिटनच्या वाणिज्यमंत्री लिझ ट्रुस भारतात आल्या होत्या. त्यावेळी दोन्ही देशांमधील व्यापारवाढीसाठी आराखडा तयार करण्यावर चर्चा झाली होती. ब्रिटनबरोबर एफटीए करार करताना दोन्ही देशांमध्ये काही मुद्यांवरून मतभेद आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी चर्चा सुरू आहे. याआधी भारताने ब्रिटनला ‘एफटीए’ करार करण्याआधी ‘प्रिफ्रेन्शिअल ट्रेड ऍग्रीमेंट’ (पीटीए) अर्थात मर्यादीत क्षेत्रात व स्वरुपाचा कारार करून पहिले पाऊल टाकण्याचा प्रस्ताव दिला होता. या पार्श्‍वभूमीवर ‘एफटीए’संदर्भात दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू होणार असल्याची वाणिज्यमंत्री गोयल यांनी दिलेली माहिती महत्त्वाची ठरते. दोन्ही देशांमध्ये एफटीएबाबत सहमती वाढत असल्याचे यातून अधोरेखित होत आहे.

leave a reply