‘पृथ्वी-२’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

बालासोर – ‘डीआरडीओ’ने ओडिशाच्या बालासोर येथील तळावरून स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू ‘पृथ्वी-२’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची रात्रीच्यावेळी यशस्वी चाचणी घेतली. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली. मागील पाच आठवड्यात १० क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. चीन सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर या चाचण्या लक्ष वेधून घेत आहेत.

'पृथ्वी-२' बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणीबालासोरच्या चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातील (आयटीआर) कॉम्प्लेक्स -३ मधील मोबाईल लाँचरद्वारे पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे रडार, इलेक्ट्रो-ऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टम आणि टेलिमेट्री स्टेशनद्वारे या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपण मार्गाचे निरीक्षण करण्यात आले. क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतल्याचे बंगालच्या उपसागरात तैनात असलेल्या जहाजावरील टीमने सांगितल्याचे ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (डीआरडीओ) म्हटले आहे.

पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे पृथ्वी-२ हे कमी पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. याची मारक क्षमता ३५० किलोमीटर आहे. पृथ्वी क्षेपणास्त्र ५०० ते १ हजार किलोग्रॅमपर्यंत स्फोटके वाहून नेऊ शकते. या क्षेपणास्त्रात दोन इंजिन आहेत. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत पृथ्वी -2 क्षेपणास्त्राची ही दुसरी यशस्वी नाईट टेस्ट आहे. यापूर्वी २३ सप्टेंबर रोजी ‘पृथ्वी -२’ ची चाचणी सूर्यास्तानंतर चाचणी घेण्यात आली होती.

पृथ्वी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या तीन आवृत्त्या आहेत. पृथ्वी-१, पृथ्वी- २ आणि पृथ्वी – ३ या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता अनुक्रमे १५० किलोमीटर, ३५० किलोमीटर आणि ६०० किलोमीटर इतकी आहे. पृथ्वी २ क्षेपणास्त्र २००३ मध्ये स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडमध्ये तैनात करण्यात आले असून देशाच्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाअंतर्गत ते तयार करण्यात आले आहे.

leave a reply