संघर्षबंदीची चर्चा फिस्कटल्यानंतर सुदान पुन्हा हवाई हल्ल्याने हादरले

जेद्दाह/खार्तूम/इस्तंबूल – सौदी अरेबियाच्या मध्यस्थीने सुदानमधील लष्कर व निमलष्करीदलात सुरू असलेली संघर्षबंदीची चर्चा फिस्कटली. दोन्ही गटांनी आपणच सुदानचा ताबा मिळविण्यात यशस्वी ठरू, असा दावा केला आहे. त्यामुळे सोमवारपासून राजधानी खार्तूम नव्या हवाई हल्ल्यांनी हादरले. दरम्यान, आपल्या राजदूताच्या वाहनावर गोळीबार झाल्याचा संताप व्यक्त करून तुर्कीने खार्तूममधील दूतावास हलविण्याची घोषणा केली आहे.

संघर्षबंदीची चर्चा फिस्कटल्यानंतर सुदान पुन्हा हवाई हल्ल्याने हादरलेगेल्या २५ दिवसांपासून सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धातील बळींची नेमकी संख्या समोर आलेली नाही. पण बळींची संख्या ७००च्या पलिकडे गेली असावी, असा दावा पाश्चिमात्य माध्यमे करीत आहेत. तर एक लाख सुदानी जनतेने स्थलांतर केल्याची माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका, सौदी अरेबिया आणि आफ्रिकन महासंघाने संघर्षबंदीचे प्रयत्न करुन पाहिले. पण दोन्ही गट संघर्षबंदीवर तयार नसून सुदानमधील संघर्ष वाढत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खार्तूममध्ये तुर्कीच्या राजदूताच्या वाहनावर गोळीबार झाला. राजदूत इस्माईल कोबानोग्लू यातून बचावले. पण तुर्कीने या घटनेची गंभीर दखल घेत खार्तूममधील दूतावास पोर्ट सुदानमध्ये हलविण्याचे जाहीर केले. गेल्या दोन आठवड्यात सुदानमध्ये तुर्कीवर झालेला हा दुसरा हल्ला ठरतो. याआधी तुर्कीच्या विमानावर गोळीबार झाला होता.

हिंदी English

 

leave a reply