युक्रेनची समस्या सोडवायची असेल तर शस्त्रपुरवठा रोखा

- रशियाचा पाश्चिमात्य देशांना इशारा

मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिका व नाटोला युक्रेनमधील संकटावर खरच तोडगा काढायचा असेल तर त्यांनी जागे व्हावे आणि युक्रेनच्या राजवटीला करण्यात येणारा शस्त्रपुरवठा रोखावा, असा खरमरीत इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिला. परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी पाश्चिमात्यांनी लादलेल्या निर्बंधांनाही लक्ष्य केले असून रशिया कधीच निर्बंधांपासून मुक्त नव्हता, याकडे लक्ष वेधले. युक्रेनबरोबर शांतीचर्चा करताना त्यात निर्बंधांचा मुद्दा उपस्थित करण्यात येईल, असेही रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, रशियाच्या मध्यवर्ती बँकेने कर्जरोख्यांचे पेमेंट केल्याची माहिती अमेरिकेकडून देण्यात आली आहे.

शस्त्रपुरवठाअमेरिका व पाश्चिमात्य मित्रदेशांनी गेल्या काही दिवसांमध्ये युक्रेनसाठी मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठ्याच्या घोषणा केल्या आहेत. यात अब्जावधी डॉलर्सच्या शस्त्रांचा समावेश आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी याबद्दल पाश्चिमात्य देशांचे आभार मानल्याचेही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेसह पाश्चिमात्य देश युक्रेनबाबत राबवित असलेल्या धोरणांना लक्ष्य केले. रशिया व युक्रेनमध्ये सध्या सुरू असलेला संघर्ष हा पाश्चिमात्य देशांकडून एकध्रुवीय जग तयार करण्याच्या प्रयत्नांचा परिणाम असल्याची टीका रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी केली.

अमेरिका व पाश्चिमात्य देशांची धोरणे नववसाहतवादाचा भाग असल्याचा दावा करून रशियाचा संघर्ष यातून जगाला मुक्त करण्यासाठी आहे, याकडेही लॅव्हरोव्ह यांनी लक्ष वेधले. अमेरिका व नाटोने नेहमीच युक्रेनचा वापर रशियाला रोखण्यासाठी केला असल्याचेही परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी बजावले. 2014 साली युक्रेनला चिथावणी देण्यात व बंड घडविण्यात पाश्चिमात्यांचा हात होता, याची आठवणही त्यांनी करून दिली. सध्या चालू असलेल्या युद्धात शांतीचर्चा पार पडून नये म्हणून पाश्चिमात्य देशच अडथळे आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान रशियाच्या मध्यवर्ती बँकेने गेल्या काही दिवसात कर्जरोख्यांचे पेमेंट केल्याची माहिती समोर आली आहे. रशियन अर्थव्यवस्था ‘डिफॉल्ट’ घोषित होईल, असे दावे विविध विश्लेषक व तज्ज्ञांकडून करण्यात येत होती. रशियन बँकेने केलेल्या पेमेंटमुळे या दाव्यांना चपराक बसल्याचे मानले जाते.

leave a reply