चीनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर तैवानच्या हवाईदलाचा युद्धसराव

 हवाईदलाचा युद्धसरावतैपेई – दोन दिवसांपूर्वी चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली. तर चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने शांघाईमधील आपल्या तैवानविरोधी लष्करी हालचाली वाढविल्याचा बातम्या येत आहेत. शांघाई शहर तैवानच्या अगदी समोर असल्यामुळे चीनने तैवानवर हल्ल्याची तयारी केल्याची शक्यता वर्तविली जाते. अशा परिस्थितीत तैवानने आपल्या हवाईदलाचा भव्य युद्धसराव आयोजित केला. तसेच येत्या काळात चीनबरोबर युद्ध भडकले तर जनतेने कोणती काळजी घ्यावी, यासंबंधीच्या सूचनाही तैवानने प्रसिद्ध केल्या आहेत.

गेल्या आठवड्यात तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’मधील (एडीआयझेड) नैॠत्येकडून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या दोन विमाने व दोन हेलिकॉप्टर्सनी घुसखोरी केली होती. चीनकडून तैवानच्या हद्दीतील घुसखोरी हा ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा भाग मानला जातो. तैवानच्या संरक्षणदलांना हैराण करण्यासाठी चीनने हे घुसखोरीचे तंत्र विकसित केल्याचे बोले जाते. याची तीव्रता चीन वाढवित आहे. वारंवार घुसखोरी करून माघार घेणारा चीन तैवानवर आकस्मिक हल्ला चढविल, असे दावे तैवानी अधिकारी, विश्‍लेषक व माध्यमे करीत आहेत.

चीनच्या शांघाय शहरामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या पार्श्वभूमीवर चीनने शांघायमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. याचा वापर करून चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने शांघायच्या रस्त्यांवरील आपल्या लष्करी हालचाली वाढविल्याचे व्हिडिओज् समोर येत आहेत. त्यामुळे चीन तैवानवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे दावे सोशल मीडियावर केले जात आहे. काही दिवसांपूर्वी तैवानच्या लष्करी विश्लेषकांनी देखील चीनच्या संशयास्पद हालचालींची दखल घेऊन हा इशारा प्रसिद्ध केला होता.

यामुळे सावध झालेल्या तैवानने आपल्या हवाई दलाचा भव्य युद्धसराव आयोजित केला होता. या सरावात तैवानच्या लढाऊ विमानांनी लाईव्ह फायरिंगची प्रात्यक्षिके सादर केली. राजधानी तैपेई आणि आसपासच्या भागात एअर रेडचा सराव केल्याचे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. चीनच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या हवाईदलाला सज्ज करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून हा सराव आयोजित करण्यात आल्याचे तैवानने स्पष्ट केले. त्याचबरोबर चीनच्या हल्ल्याविरोधात आपल्या जनतेची तयारी करण्यासाठी तैवानने सूचना देणारी पुस्तिका प्रसिद्ध केली. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर तैवानने ही तयारी केल्याचा दावा केला जातो.

अमेरिका व नाटो युक्रेनच्या युद्धात गुंतले असून त्यांचे तैवानकडे दुर्लक्ष होत आहे. याचा पुरेपूर लाभ चीन घेऊ शकेल, असे दावे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विश्‍लेषक करीत आहेत. जपानने देखील यावरून अमेरिकेला गंभीर इशारे दिले होते. चीनचा तैवानवरील हल्ला हा जपानवरील हल्ला मानला जाईल, असा इशारा जपानने दिला आहे. त्याचवेळी तैवान म्हणजे युक्रेन नाही आणि चीन हा काही रशिया नाही, असे सांगून तैवानने आपल्या संरक्षणसिद्धतेबाबत आत्मविश्‍वास व्यक्त केला. तैवानवरील हल्ला चीनला पचविता येणार नाही, असे तैवान सातत्याने बजावत आहे.

leave a reply