चीनच्या वर्चस्ववादी धोरणांच्या पार्श्‍वभूमीवर जपान व इटलीत संरक्षण सहकार्य मजबूत करण्यावर एकमत

संरक्षण सहकार्य मजबूतटोकिओ/रोम – इंडो-पॅसिफिक क्षेत्रासह आशिया खंडातील चीनच्या वाढत्या वर्चस्ववादी कारवाया रोखण्यासाठी जपानने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी युरोपिय देशांबरोबर आघाडी तयार करण्याचे प्रयत्न जपानने सुरू केले आहेत. मंगळवारी इटलीच्या संरक्षणमंत्र्यांनी जपानला दिलेली भेट याचाच भाग मानला जातो. या भेटीत दोन देशांदरम्यान संरक्षण सहकार्य मजबूत करण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोरोनाची साथ, हॉंगकॉंगमधील कायदा व साऊथ चायना सीमधील कारवाया यामुळे यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनविरोधातील असंतोष वाढीस लागला आहे. चीनशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणार्‍या व व्यापारी भागीदार असणार्‍या युरोपिय देशांनीही चीनविरोधात आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. युरोपातील आघाडीच्या देशांनी चीनविरोधातील धोरण बदलण्याचे संकेत दिले आहेत. याचा फायदा जपानने उचलला असून चीनच्या विरोधातील आघाडी विस्तारण्याचे प्रयत्न चालविले आहेत. गेल्या दोन वर्षात चीनच्या मुद्यावर ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी या आघाडीच्या युरोपिय देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यात जपानला यश आले आहे. इटलीबरोबरील सहकार्य त्याचाच पुढील टप्पा असल्याचे दिसत आहे.

गेल्या वर्षी इंडो-पॅसिफिकच्या मुद्यावर जपानमध्ये भारत-इटली-जपान अशी त्रिपक्षीय बैठक पार पडली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी युरोप दौर्‍यादरम्यान इटलीच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली होती. जपान व इटलीच्या हवाईदलांमध्ये परस्पर सहकार्याचा करारही झाला असून जपानच्या लढाऊ वैमानिकांना इटलीत प्रशिक्षण दिले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर, इटलीचे संरक्षणमंत्री लॉरेन्झो गुरिनी यांचा जपान दौरा महत्त्वाचा ठरतो.

जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी व इटलीचे गुरिनी यांच्यात इंडो-पॅसिफिक क्षेत्र, संयुक्त लष्करी सराव व संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य या मुद्यांवर चर्चा झाली. इटलीने जपानला नवे लढाऊ विमान विकसित करण्याच्या प्रकल्पात सहाय्य देण्याचा प्रस्तावही दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी ब्रिटन व जपानने लढाऊ विमानाचे इंजिन विकसित करण्यासाठी करार केला आहे. इटलीने त्यातील सहभागाविषयी दिलेला प्रस्ताव लक्ष वेधून घेणारा ठरतो. पुढील महिन्यात जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा युरोप दौर्‍यावर जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या दौर्‍यात ते इटलीला भेट देण्याची शक्यता असल्याची माहिती जपानी सूत्रांनी दिली.

leave a reply