तालिबानच्या क्रूर कारवाया सुरू

- ‘हजारा’ अल्पसंख्यांक, पोलिस अधिकारी व पत्रकाराच्या निकटवर्तीयाचा बळी

काबुल – तालिबानच्या दहशतवाद्यांनी आपले विरोधक, टीकाकारांची धरपकड करून त्यांची क्रूरपणे हत्या सुरू केली आहे. बदघिस प्रांताच्या पोलीस प्रमुखाच्या निघृण हत्येचा व्हिडिओ समोर आला. तर जर्मन वर्तमानपत्रासाठी काम करणाऱ्या पत्रकाराच्या कुटुंबातील सदस्याला तालिबानच्या दहशतवाद्यांनी ठार केले. कंदहार प्रांतात तालिबानच्या दहशतवाद्यांनी ‘आयएस’प्रमाणे लष्करी संचलन करून आपल्या विरोधकांना इशारा दिला. त्याचवेळी अफगाणी राष्ट्रध्वज फडकावून तालिबानच्या विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या निदर्शकांवर निर्दयतेने गोळीबार करण्याचे सत्र तालिबानने सुरू ठेवले आहे. तर जुलै महिन्यात तालिबानने हजारा समुदायातील नऊ जणांचे भयंकर हत्याकंड घडविल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे.

तालिबानच्या क्रूर कारवाया सुरू - ‘हजारा’ अल्पसंख्यांक, पोलिस अधिकारी व पत्रकाराच्या निकटवर्तीयाचा बळीतालिबानने आपल्यामध्ये औदार्यपूर्ण बदल झाल्याचे दाखवून देण्यासाठी सामुदायिक माफीची घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात तालिबानचे दहशतवादी घराघरांमध्ये जाऊन आपल्या विरोधकांच्या नोंदी घेत आहेत. यापैकी काही विरोधकांना ताब्यात घेऊन तालिबानने त्यांची हत्या घडविल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. तालिबानचा हा दहशतवादी चेहरा समोर आल्यानंतर, अफगाणी जनतेमधील तालिबानच्या विरोधातील असंतोष अधिकच तीव्र बनला आहे.

अफगाणी नागरिक राष्ट्रध्वज हातात घेऊन तालिबानचा धिक्कार करीत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. बुधवारी अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी देशभरात ठिकठिकाणी अशी निदर्शने झाली होती. यामध्ये अफगाणी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. तालिबानच्या दहशतवाद्यांनी या निदर्शकांवर केलेल्या कारवाईत किमान 16 जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो.

तालिबानच्या क्रूर कारवाया सुरू - ‘हजारा’ अल्पसंख्यांक, पोलिस अधिकारी व पत्रकाराच्या निकटवर्तीयाचा बळीतर शुक्रवारी राजधानी काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरही तालिबानच्या ‘स्पेशल फोर्स’च्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात जर्मन नागरिक जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे. तर रविवारी तालिबानने लघमन प्रांतातचे माजी गव्हर्नर अब्दुल वली वाहिदझई आणि माजी पोलिस अधिकारी लोतफुल्ला कामराम यांचे अपहरण केले होते. चार दिवसानंतरही वाहिदझई आणि कामराम यांचा पत्ता लागलेला नसून तालिबानने त्यांची हत्या केल्याचा आरोप संबंधितांचे कुटुंबिय करीत आहेत. तालिबानने आपल्यावरील हे आरोप फेटाळले आहेत. पण अपहरण केलेल्यांची माहिती तालिबान उघड करायला तयार नाही.

तालिबानच्या या कारवाईविरोधात पंजशीरमध्ये नॉर्दन अलायन्सची लष्करी जमवाजमव सुरू झाल्याच्या बातम्या येत आहेत. शुक्रवारी या तालिबानविरोधी लष्करी आघाडीने पुली-हेसार, देह-ए-सलाह आणि बानू या तीन जिल्ह्यांचा ताबा घेतल्याचा दावा केला जातो. यापैकी पुली-हेसारमधील कारवाईत तालिबानच्या 60 दहशतवाद्यांना ठार केल्याचे या लष्करी आघाडीचे म्हणणे आहे. त्याचवेळी तालिबानच्या शिष्टमंडळाने नॉर्दन अलायन्सचे नेते अहमद मसूद यांची भेट घेतल्याच्याही बातम्या आहेत.

leave a reply