अफगाण-इराण सीमेवरील महत्त्वाच्या चौकीवर तालिबानचा ताबा

अफगाण-इराणकाबुल – अफगाणिस्तानातील महत्त्वाची शहरे, जिल्हे आपल्या नियंत्रणाखाली आणणार्‍या तालिबानने गुरुवारी इराणच्या सीमेवरील अतिशय महत्त्वाची सुरक्षाचौकी ताब्यात घेतली. अफगाण-इराणमधील व्यापारी वाहतूक याच मार्गाने केली जाते. त्यामुळे तालिबानला मोठे यश मिळाल्याचा दावा केला जातो. काही तासांपूर्वी इराणमध्ये अफगाण सरकार आणि तालिबानच्या प्रतिनिधींमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली होती. त्यानंतर सदर सुरक्षाचौकीवर तालिबानने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

गुरुवारी संध्याकाळी तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या पश्‍चिमेकडील हेरात प्रांतातील ‘इस्लाम काला’ या भागात हल्ले चढवून येथील जकात विभागाची सूत्रे हाती घेतली होती. तालिबानच्या या कारवाईचे व्हिडिओ स्थानिक माध्यमांमध्ये फिरत होते. तालिबानच्या या हल्ल्यानंतर या भागातील अफगाणी जवान व अधिकार्‍यांनी सुरक्षित आश्रयासाठी सीमा ओलांडून इराणमध्ये धाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. अफगाणिस्तानच्या सरकारी अधिकार्‍यांनी देखील तालिबानने या चौक्यांचा ताबा घेतल्याची कबुली दिली.

अफगाण-इराण

तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद याने शुक्रवारी केलेल्या कारवाईची माहिती दिली. तालिबानने केलेल्या कारवाईत ‘इस्लाम काला’ येथील सुरक्षाचौकीचा पूर्ण ताबा घेतल्याचे मुजाहिदने जाहीर केले. शुक्रवारपासूनच ही सुरक्षाचौकी व येथील कारभार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्याने दिली.

गेल्या वर्षी इराणने अफगाणिस्तानला दोन अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती. यापैकी बहुतांश निर्यात दोघारून-इस्लाम काला भागातूनच झाली होती. त्यामुळे इराण व अफगाणिस्तानातील व्यापारी वाहतुकीच्या दृष्टीने तालिबानने महत्त्वाची सुरक्षाचौकी ताब्यात घेतल्याचा दावा केला जातो.

अफगाण-इराणगेल्या दहा दिवसात तालिबानने अफगाणिस्तानच्या पाच शेजारी देशांच्या सीमेजवळील जिल्ह्यांचा ताबा घेतला आहे. यामध्ये पाकिस्तानच्या सीमेजवळील कुनार प्रांतातील घागची, चीनजवळच्या बादखशान प्रांतातील वाखान, ताजिकिस्तान सीमेवरील कुंदूझ प्रांतातील शेर खान बंदर, तुर्कमेनिस्तानजवळच्या बदघिस प्रांतातील मोआकोर जिल्ह्यांचा समावेश आहे. तर गुरुवारी इराणच्या सीमेजवळील हेरात प्रांतातही तालिबानने मुसंडी मारली.

दरम्यान, अफगाणिस्तानातील गनी सरकार आणि तालिबान यांच्यात शांतीचर्चा घडविण्यासाठी इराण प्रयत्न करीत आहे. या पार्श्‍वभूमीवर, दोन दिवसांपूर्वी इराणची राजधानी तेहरान येथे अफगाण सरकार व तालिबानच्या प्रतिनिधींमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली होती. इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी या बैठकीत मध्यस्थी केली होती. त्यानंतर इराणच्या सीमेजवळ हल्ला चढवून तालिबानने सुरक्षाचौकीचा ताबा घेतला.

leave a reply