अफगाणिस्तानातील वेगवान सैन्यमाघारीमुळे अमेरिकन जवानांची सुरक्षा निश्‍चित झाली – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन

वॉशिंग्टन – स्पीड इज सेफ्टी, अर्थात सैन्यमाघारीच्या वेगामुळे सुरक्षा निश्‍चित होत असल्याचे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. अमेरिका अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेताना घाई करीत आहे आणि याचे भयंकर दुष्परिणाम समोर येत असल्याचा आरोप होत आहे. तालिबानने अफगाणिस्तानची अधिकाधिक भूमी बळकावण्याचा सपाटा लावला, त्याला अमेरिकेने घाईने घेतलेली माघार जबाबदार असल्याचा ठपका ठेवला जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, बायडेन यांनी अफगाणिस्तानतील माघारीबाबत ही घोषणा केली. यानुसार 31 ऑगस्टपर्यंत अमेरिकेचे सक्रीय सैन्य अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघार घेणार आहे.

सुरक्षा निश्‍चित

सैन्यमाघारीवरील आक्षेपांना उत्तर देताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी गेल्या 20 वर्षात लाखो कोटी डॉलर्स या युद्धात खर्च झाले आणि 2448 अमेरिकन जवान या युद्धात मारले गेले, याची आठवण करून दिली. अफगाणिस्तानातील युद्धासाठी अमेरिकेच्या पुढच्या पिढ्यांना वेठीस धरता येणार नाही, असा दावा केला. अफगाणिस्तानची उभारणी करण्यासाठी अमेरिकेने या देशात युद्ध छेडले नव्हते. ओसामा बिन लादेनला नरकाच्या दारापाशी नेऊन ठेवणे आणि अमेरिकेवर हल्ला चढविण्याची अल कायदाची क्षमता नष्ट करणे, ही दोन उद्दिष्टे समोर ठेवून अमेरिकेने हे युद्ध केले. ते साध्य झालेले आहे, असा दावा बायडेन यांनी केला.

असे असले तरी अफगाणिस्तानची मोहीम पूर्णपणे संपली व ‘मिशन अकंप्लिश्ड्’ झाल्याचा दावा करता येणार नाही. या देशात दहशतवादी संघटनांना अमेरिकेवर हल्ला चढविता येण्याची क्षमता प्राप्त करू दिली जाणार नाही. आपले हे सुरक्षाविषयक हितसंबंध जपण्यासाठी अमेरिका आपल्या लष्करी व गुप्तचर विभागाचे अस्तित्त्व अफगाणिस्तानात कायम ठेवणार असल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले. अफगाण लष्कराला मिळणारे आर्थिक सहाय्य यापुढेही सुरू राहिल, अशी ग्वाही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिली.

‘तालिबान सामर्थ्यशाली बनली आहे, हे खरे असले तरी 75 हजार तालिबानी दहशतवाद्यांचा, प्रशिक्षित आणि शस्त्रसज्ज अशा तीन लाख अफगाणी लष्करासमोर निभाव लागणार नाही. त्यामुळे अमेरिकेच्या माघारीनंतरही संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानच्या हाती जाणार नाही. याबाबत माझा तालिबानवर नाही तर अफगाणी लष्कराच्या क्षमतेवर विश्‍वास आहे’, असा दावा बायडेन यांनी केला.

पण, ‘जगातील कुठलाही देश किंवा राजवट अफगाणिस्तानला एकसंघ ठेवू शकलेले नाहीत. यासाठी अफगाण सरकार आणि नेत्यांना एकजूट करावी लागेल, असा सल्ला बायडेन यांनी दिला. त्याचबरोबर, ‘अफगाणिस्तानवर नियंत्रण असणारे एकीकृत सरकार असण्याची शक्यता फारच कमी आहे’, असे सांगून अफगाणिस्तानात दोन किंवा त्याहून अधिक समांतर सरकार असतील, असे संकेत बायडेन यांनी दिले. त्यामुळे एकाच वेळी काबुलमधले राष्ट्राध्यक्ष गनी यांचे सरकार आणि तालिबानच्या ताब्यातील भूभाग, अशारितीने अफगाणिस्तानची विभागणी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तालिबान पूर्ण अफगाणिस्तानचा ताबा घेऊ शकणार नाही, असा दावा करून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी यावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसत आहे.

अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील माघारीची तुलना 1975 सालच्या व्हिएतनाममधील पराजयशी करणे, योग्य ठरणार नसल्याचे बायडेन म्हणाले. उत्तर व्हिएतनामचे कम्युनिस्ट जवान आणि तालिबान यांच्या क्षमतेत मोठा फरक असल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले. तसेच व्हिएतनामप्रमाणे अमेरिकेला अफगाणिस्तानच्या दूतावासात हेलिकॉप्टर उतरवून माघार घ्यावी लागलेली नाही, याकडे बायडेन यांनी लक्ष वेधले.

leave a reply