तालिबान व पाकिस्तानच्या जवानांचा ड्युरंड लाईनवर संघर्ष सुरू

ड्युरंडकाबुल – अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केलात तर गोळ्या घालू, अशी धमकी तालिबानने काही दिवसांपूर्वी ड्युरंड सीमेवर तैनात पाकिस्तानच्या जवानांना दिली होती. शुक्रवारी दुपारी तालिबानने आपली धमकी प्रत्यक्षात उतरविली. बजौर भागात पाकिस्तानी लष्कराबरोबर पेटलेल्या संघर्षात तालिबानने पाकिस्तानी लष्कराच्या दोन जवानांना ठार केले. तसेच पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांजवळ मॉर्टर हल्ले चढविल्याचे व्हिडिओ तालिबानने प्रसिद्ध केले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तालिबानची वकिली करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर सडकून टीका सुरू झाली आहे.

पाच दिवसांपूर्वीच अफगाण तालिबानने ड्युरंड सीमेवर पाकिस्तानी लष्कर उभारीत असलेले काटेरी तारेचे कुंपण उखडून टाकले होते. पाकिस्तानी जवानांच्या ताब्यातून या काटेरी तारा खेचून घेत तालिबानी गाड्यातून निघून गेले होते. पाकिस्तानी जवानांची झालेली फजिती व त्यांना दिलेल्या धमकीचा व्हिडिओ करून तालिबानने सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. तर पाकिस्तानी लष्कर बेकायदेशीररित्या अफगाणिस्तानच्या सीमेत कुंपण टाकत असल्याचे सांगून तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने पाकिस्तानला चपराक लगावली होती.

ड्युरंडया दोन्ही घटनानंतर पाकिस्तानी माध्यमांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले होते. पाकिस्तानच्या संसदेतही याचे पडसाद उमटले होते. विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारला यावर जाब विचारला होता. शुक्रवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारचा वरिष्ठ अधिकारी पाकिस्तानी माध्यमांना याबाबत खुलासा देत होता. ड्युरंड सीमेबाबतचा वाद चर्चेद्वारे मिटविण्याचे तालिबानच्या वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर निश्‍चित झाले आहे, अशी सारवासारव सदर अधिकार्‍याने केली.

पाकिस्तानची माध्यमे या अपुर्‍या माहितीवर चर्चा करीत असताना, ड्युरंड सीमेवर तालिबान आणि पाकिस्तानच्या जवानांमध्ये संघर्ष पेटल्याचा व्हिडिओ समोर आला. पाकिस्तानच्या बजौर प्रांतातील गंजगाल आणि सरकानो तर अफगाणिस्तानच्या कुनार प्रांताच्या सीमेवर हा संघर्ष पेटल्याचे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या माहितीत म्हटले आहे. तालिबानने स्नायपर रायफल्सचा वापर करून पाकिस्तानी लष्कराच्या दोन जवानांना ठार केले. त्यानंतर दोन्ही बाजूने मॉर्टर्सचे हल्ले झाले. साधारण ३० मिनिटे हा संघर्ष सुरू होता, असा दावा केला जातो.

पण सोशल मीडियावरील अन्य माहितीमध्ये शुक्रवारी दुपारी सुरू झालेला हा संघर्ष शनिवारपर्यंत थांबलेला नाही, असे म्हटले आहे. अधूनमधून तालिबानी व पाकिस्तानी जवानांमध्ये गोळीबार सुरू आहे. तर या संघर्षात पाकिस्तानच्या लष्कराला मोठी जीवितहानी सहन करावी लागल्याचा दावा केला जातो. ड्युरंड सीमेवरील सज्जता म्हणून तालिबान पाकिस्तानी लष्कराला उत्तर देण्यासाठी रॉकेट लॉंचर्स रवाना करीत असल्याचे स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे.

ड्युरंडपंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारने ड्युरंड सीमेवरील घडामोडींवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. पण अफगाण तालिबान आणि तेहरिक-ए-तालिबान, दोघेही एकत्र येऊन ‘ग्रेटर अफगानिस्तान’ची तयारी करीत असल्याची चिंता पाकिस्तानी पत्रकार व्यक्त करीत आहेत. तालिबान सीमेवर हल्ले चढवित आहे. तर तेहरिकचे दहशतवादी पाकिस्तानमध्ये घातपात माजवून सुरक्षेला आव्हान देत असल्याचे हे पत्रकार लक्षात आणून देत आहेत. यामुळेच पाकिस्तानने वारंवार मागणी केल्यानंतरही तालिबानने तेहरिकवर कारवाई केली नव्हती. कारण तेहरिक म्हणजे अफगाणिस्तानातील तालिबानने पाकिस्तानच्या विरोधात उतरविला ‘विमा’ आहे. पण पाकिस्तानच्या बिनडोक सरकार व लष्कराने ते कधीही लक्षात घेतले नाही, अशी टीका पाकिस्तानचे पत्रकार करीत आहेत.

leave a reply