अफगाणिस्तानात पाकिस्तानच्या पाठबळावर तालिबानची राजवट येत आहे

- अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

वाशिंग्टन – पाकिस्तानने तालिबानचे वकीलपत्र घेतलेले नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले होते. पण, पाकिस्तानचे सरकार, लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा गेल्या काही दशकांपासून अफगाण तालिबानच्या सतत संपर्कात आहेत. अफगाणिस्तानात राजवट प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानच तालिबानला पूर्ण सहाय्य करीत आहे, असा आरोप अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी केला.

तालिबानने अफगाणिस्तानात जोरदार मुसंडी मारली असून अवघ्या सात आठवड्यांमध्ये तालिबानने 50 जिल्ह्यांवर ताबा घेतला आहे. याशिवाय तालिबानच्या हल्ल्यांसमोर अफगाणी लष्कर माघार घेत आहेत, तर काही ठिकाणी अफगाणी जवानांनी तालिबानच्या दहशतवाद्यांसमोर शरणागती पत्करली आहे. अफगाणिस्तानातील तालिबानच्या या मुसंडीसाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बोल्टन यांनी केला.

पाकिस्तान तालिबानला सुरक्षित आश्रयस्थाने देत असून पाकिस्तानच्या समर्थानामुळेच तालिबान अमेरिका आणि अफगाणी लष्करावर हल्ले चढवित आहे. पाकिस्तान तालिबानला देत असलेल्या या समर्थनाचे येत्या काळात भीषण परिणाम होतील, असा इशारा बोल्टन यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना दिला. तालिबानने अफगाणिस्तानात आपली राजवट प्रस्थापित केली तर त्याचे परिणाम अफगाणिस्तान किंवा अमेरिकाच नाही तर पाकिस्तानलाही भोगावे लागतील. पाकिस्तानच्या सरकारवरील तालिबानसमर्थक कट्टरपंथियांचा प्रभाव वाढेल, असे बोल्टन यांनी बजावले.

दरम्यान, आपल्या देशातील अस्थैर्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा करीत आहेत. पण पाकिस्तानचे नेते अफगाणिस्तानचे हे आरोप फेटाळत आहेत. पण अमेरिकेचे माजी नेते तसेच सुरक्षा अधिकारी पाकिस्तान आणि तालिबानमधील सहकार्याचा वारंवार पर्दाफाश करीत आहेत.

leave a reply