ऑस्ट्रेलिया व चीनमधील तणाव अधिकच वाढला

कॅनबेरा/बीजिंग – जागतिक व्यापार परिषदेतील (डब्ल्यूटीओ) तक्रारीवरून ऑस्ट्रेलिया व चीनमध्ये सुरू झालेला संघर्ष अधिक तीव्र बनला आहे. ऑस्ट्रेलियाने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून अंटार्क्टिकामधील चीनबरोबरची संयुक्त संशोधन मोहीम रद्द करून टाकली. तर ‘युनेस्को’मधील समितीचे अध्यक्षपद भूषविणार्‍या चीनने ऑस्ट्रेलियातील प्रवाळांना (कोरल रीफ) असलेला ‘हेरिटेज’ दर्जा रद्द करण्याचा इशारा दिला. नजिकच्या काळात ऑस्ट्रेलिया व चीनमध्ये असे खटके उडलेले सातत्याने पहायला मिळतील, असे विश्‍लेषकांनी बजावले आहे.

गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाने चीनने लादलेल्या व्यापारी करांविरोधात ‘डब्ल्यूटीओ’मध्ये तक्रार दाखल केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी चीननेही ऑस्ट्रेलियाविरोधात स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. चिनी कंपन्यांचे हितसंबंध जपण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचा खुलासा चीनकडून करण्यात आला आहे. चीनकडून हे प्रत्युत्तर येत असतानाच ऑस्ट्रेलियाने अंटार्क्टिकामधील संयुक्त संशोधन मोहीम रद्द करण्याची घोषणा केली.

ऑस्ट्रेलियन गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी दिलेल्या इशार्‍यानंतर ही मोहीम रद्द झाल्याचे सांगण्यात येते. ‘ऑस्ट्रेलियन सिक्युरिटी इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन’चे प्रमुख माईक बर्गेस यांनी अंटार्क्टिकातील मोहीम चीनला ‘सबमरिन वॉरफेअर’मध्ये सहाय्यक ठरु शकते, असे बजावले आहे. ऑस्ट्रेलियन विश्‍लेषक अँथनी बर्गिन यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. संशोधन मोहिमेत चीनकडून सहभागी असणारी ‘किंगडाओ रिसर्च इन्स्टिट्यूट’ चिनी नौदलाच्या प्रकल्पांशी जोडलेली आहे, याकडे बर्गिन यांनी लक्ष वेधले.

अंटार्क्टिकामधील मोहीम रद्द झाल्याच्या घोषणेनंतर युनेस्कोच्या समितीचा निर्णय समोर आला आहे. ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध प्रवाळ बेटांचे क्षेत्र असलेले ‘ग्रेट बॅरिअर रिफ’ धोकादायक असल्याची शिफारस समितीने केली आहे. ‘ग्रेट बॅरिअर रिफ’ला दिलेला ‘वर्ल्ड हेरिटेज’चा दर्जा काढून घेण्याचेही संकेत देण्यात आले आहेत. या समितीचे प्रमुख पद चीनकडे आहे. ‘ग्रेट बॅरिअर रिफ’च्या वृत्तावर ऑस्ट्रेलियाकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटली असून या निर्णयामागे राजकारण असल्याचा आरोप ऑस्ट्रेलिया सरकारने केला आहे.

एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे ऑस्ट्रेलिया-चीनमध्ये वादाचा नवा भडका उडण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही वर्षात 5जी तंत्रज्ञान, कोरोनाची साथ, साऊथ चायना सी, तैवान, हाँगकाँग यासारख्या अनेक मुद्यांवरून दोन देश एकमेकांच्या समोर?खडे ठाकले होते. या वादामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू झाले आहे. त्यानंतरच्या काळात चीनने ऑस्ट्रेलियाविरोधात ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा वापर सुरू केल्याचेही दावे समोर येत आहेत.

leave a reply