रशिया व मध्य आशियाई देशांना तालिबानचा धोका

- नॉर्दन अलायन्सच्या कमांडरचा इशारा

मॉस्को – ‘तालिबानच्या दहशतवादापासून मध्य आशियाई देश आणि रशिया देखील सुरक्षित राहू शकत नाही. म्हणूनच रशियाने तालिबानकडे अतिशय सावधपणे पाहणे गरजेचे आहे. कारण तालिबानपासून मध्य आशिया आणि रशियालाही फार मोठा धोका संभवतो’, असा इशारा नॉर्दन अलायन्सच्या कमांडरने दिला. रशिया तालिबानला मान्यता देण्याच्या विचारत असल्याचे संकेत मिळत असताना, नॉर्दन अलायन्सच्या कमांडरने रशियाला या धोक्याची जाणीव करून दिली.

रशियन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नॉर्दन अलायन्सचा कमांडर ‘फहीम दाश्‍ती’ याने तालिबानचा धोका अधोरेखित केला. नॉर्दन अलायन्सचा नेता अहमद शहा मसूद यांचा विश्‍वासार्ह सहकारी अशी दाश्‍ती याची ओळख आहे. तालिबानवर विश्‍वास ठेवू नका, असे रशियाला बजावणाऱ्या या कमांडरने तालिबानपासून मध्य आशियाई देशांना संभवणाऱ्या धोक्याची माहिती दिली. तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तान दहशतवाद्यांचे केंद्र बनले. इथूनच साऱ्या जगात दहशतवाद्यांची निर्यात सुरू होईल. यामुळे तालिबान साऱ्या जगासाठी धोकादायक ठरेलच. पण अफगाणिस्तानला लागून असलेल्या मध्य आशियाई देशांमध्ये दहशतवादाचा फैलाव मोठ्या वेगाने होईल, असे दश्‍ती याने बजावले.

मध्य आशियाई देशांबरोबरच रशियाला देखील या दहशतवादाच्या लाटेचा सामना करावा लागेल, असे दश्‍ती पुढे म्हणाला. सध्या रशियाने तालिबानबाबतची आपली भूमिका सौम्य केल्याचे दिसत आहे. तालिबानला मान्यता देण्यासाठी उत्सुक असलेल्या देशांमध्ये चीनबरोबर रशियाचाही समावेश असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत तालिबानपासून रशियाला असलेल्या धोक्याचा इशारा देऊन दश्‍ती याने रशिया तसेच मध्य आशियाई देशांनाही सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. आधीच ताजिकिस्तानने तालिबानच्या दहशतवादी राजवटीला मान्यता देणार नाही, हे जाहीर करून टाकले आहे. इतर मध्य आशियाई देशांनी इतकी स्पष्ट भूमिका घेतलेली नसली, तरी हे देश तालिबानकडे संशयाने पाहत असल्याचे दिसते.

या पार्श्‍वभूमीवर, अफगाणिस्तानात स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी तालिबानचा वापर होऊ शकते, असे दावे करीत असलेल्या रशियाला आपल्या भूमिकेवर फेरविचार करण्याचा सल्ला नॉर्दन अलायन्सकडून दिला जात आहे. पुढच्या काळात तालिबानच्या दहशतवादी धोरणांना आंतरराष्ट्रीय पातळीवरून विरोध वाढला, तर नॉर्दन अलायन्सचे महत्त्व अधिकच वाढू शकते. तसेच अफगाणी जनता नॉर्दन अलायन्सच्या मागे उभी राहिली, तर तालिबानला अफगाणिस्तानवर राज्य करणे शक्यच होणार नाही. यामुळे आत्ताच्या काळात नॉर्दन अलायन्सकडे दुर्लक्ष करणे रशिया तसेच मध्य आशियाई देशांना परवडणारे नसल्याचे दिसते.

leave a reply