नाटो जवानांच्या काबुलमधील तैनातीचे भीषण परिणाम होतील – तालिबानची अमेरिका, नाटोला धमकी

दोहा/काबुल – ‘अमेरिका आणि नाटोच्या सदस्य देशांनी कतारमध्ये झालेल्या कराराचे पालन करून अफगाणिस्तानातून पूर्ण माघार घ्यावी. 11 सप्टेंबर नंतर नाटोचा एक जवान काबुलमध्ये दिसला तर, त्याचे भीषण परिणाम होतील’, अशी धमकी तालिबानचा प्रवक्ता सोहेल शाहिन याने दिली. अमेरिकेने अफगाणिस्तानातील माघारीनंतरही काबुलमध्ये एक हजार जवान तैनात ठेवण्याचे जाहीर केले आहे. तर तुर्की आणि ब्रिटनने देखील आपले विशेष सुरक्षा पथक तैनात करण्याची घोषणा केली. या पार्श्‍वभूमीवर, तालिबानने ही धमकी दिली आहे.

भीषण परिणामअमेरिकेने अफगाणिस्तानातील सर्वात मोठा तळ बगरामची किल्ली अफगाणी लष्कराकडे सोपविली. अमेरिकेचे 50 टक्के जवान व शस्त्रास्त्रे विमानाने मायदेशी परतली असून उर्वरित जवान ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत माघार घेतील, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी जाहीर केले. तरीही अफगाणिस्तानातील हवाई हल्ले सुरू ठेवण्यासाठी कतारमधून मोहीम राबविणार असल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण मुख्यालयाचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी दिली.

त्याचबरोबर, राजधानी काबुलमधील दूतावास आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुरक्षेसाठी सुमारे एक हजार जवान मागे ठेवण्याचे अमेरिकेने जाहीर केले. अमेरिकेप्रमाणे तुर्की व ब्रिटननेही सप्टेंबरच्या माघारीनंतरही काबुलमध्ये आपले जवान तैनात असतील, असे म्हटले आहे. तुर्कीच्या या तैनातीवर तालिबानने आधीच इशारा दिला होता. पण अमेरिका आणि ब्रिटनच्या नव्या घोषणेनंतर तालिबानने नाटोच्या सर्वच सदस्य देशांना पुन्हा एकदा धमकावले.

भीषण परिणाम‘कतार येथील कराराप्रमाणे नियोजित मुदतीपर्यंत नाटोच्या सर्व जवानांनी अफगाणिस्तानातून निघून जावे. काबुलचा ताबा घेणे हा तालिबानच्या धोरणाचा भाग नाही. पण नियोजित मुदतीनंतरही नाटोचे जवान किंवा लष्करी कंत्राटदार जरी काबुलमध्ये दिसले तर तालिबानला आपल्या या धोरणात बदल करून इतर पर्यायांचा विचार करावा लागेल. अशा परदेशी जवानांना घुसखोर ठरविले जाईल’, अशी धमकी शाहिन याने दिली.

‘पाश्‍चिमात्य देशांचे दूतावास, राजनैतिक अधिकारी, स्वयंसेवी संघटना व त्यांच्या स्वयंसेवकांशी तालिबानचे वैर नाही. त्यांना तालिबानपासून कुठलाही धोका नाही’, असे कतार येथील तालिबानच्या राजकीय दूतावासातील प्रवक्ता शाहिन याने ब्रिटीश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तसेच अमेरिकेच्या लष्कराने बगराम हवाईतळाचा सोडलेला ताबा म्हणजे ऐतिहासिक घटना असल्याचे शाहिन म्हणाला.

दरम्यान, गेल्या आठवड्यात अमेरिकेने बगराम तळाचा ताबा सोडल्यानंतर रविवारी तालिबानने या तळाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. सुमारे तालिबानच्या 20 दहशतवाद्यांनी येथील सुरक्षाचौकीवर हल्ला चढविला होता. पण अफगाणी लष्कराने तालिबानचा हा हल्ला उधळल्याची माहिती अफगाणी लष्कराने दिली. तर तालिबानच्या हल्ल्यामुळे भेदरलेल्या हजाराहून अधिक अफगाणी जवानांनी ताजिकिस्तानमध्ये पलायन केल्याच्या बातम्या येत आहेत.

leave a reply