कम्युनिस्ट राजवटीने देशाची प्रतिमा नष्ट केल्याची चिनी जनतेची टीका – जपानच्या वर्तमानपत्राचा दावा

टोकिओ – चीनला टक्कर देऊ पाहण्यार्‍या परदेशी शक्तींना 1.4 अब्ज चिनी जनतेच्या पोलादी भिंतीची धडक बसेल, असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गेल्या आठवड्यात दिला. पण आपल्या शेजारी देशांसह आंतरराष्ट्रीय समुदयाला जिनपिंग यांनी दिलेल्या धमकीवर चीनमध्येच नाराजी व्यक्त होत आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या कारभारामुळे देशाची प्रतिमा खराब झाली असून शेजारी देशांबरोबरील संबंध बिघडल्याची चिंता चिनी जनता व्यक्त करीत आहे. यासाठी कोरोनाबाबत केलेली लपवाछपवी, हाँगकाँग-तैवान, साऊथ आणि ईस्ट चायना सीबाबत स्वीकारलेली लष्करी आक्रमकता जबाबदार असल्याचे चिनी जनतेचे म्हणणे आहे. जिनपिंग यांच्या भाषणानंतर जपानमधील आघाडीच्या वर्तमानपत्राने घेतलेल्या चिनी जनतेच्या प्रतिक्रियेतून हे उघड झाले आहे.

देशाची प्रतिमागेल्या आठवड्यात कम्युनिस्ट पार्टीच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात कम्युनिस्ट पार्टीचे सर्वेसर्वा व चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी आक्रमक भाषण ठोकले होते. चीनच्या विकासात कम्युनिस्ट पार्टीने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा जिनपिंग यांनी केला होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेचा विषय ठरलेल्या हाँगकाँग, झिंजियांग व तैवानबाबत जिनपिंग यांनी शेजारी तसेच पाश्चिमात्य देशांना धमकावले. या भाषणावर तैवानमधून प्रतिक्रिया आली होती.

पण जपानी वर्तमानपत्राशी बोलताना चिनी नागरिकांनी जिनपिंग तसेच कम्युनिस्ट राजवटीवर ताशेरे ओढले. ‘चीन म्हणजे काही कम्युनिस्ट पार्टी नाही’, असे स्पष्ट मत चिनी नागरिक व्यक्त करीत आहेत. कोरोनाच्या फैलावाबाबत कम्युनिस्ट राजवटीने केलेली लपवाछपवी चीनची प्रतिमा डागाळण्यासाठी महत्त्वाची घटना ठरली, असे एका नागरिकाने म्हटले. तर ‘हाँगकाँग आणि तैवान तसेच साऊथ आणि ईस्ट चायना सीबाबत कम्युनिस्ट पार्टीने स्वीकारलेली आक्रमक चीनच्या भूमिका शेजारी देशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरत आहे’, अशी चिंता काही चिनी नागरिकांनी व्यक्त केली.

देशाची प्रतिमाझिंजियांगमधील मानवाधिकारांचे उल्लंघन आणि बुद्धिसंपदेच्या चोरीबाबत होणारे आरोप गंभीर असून यामुळे जपानसह इतर देशांच्या कंपन्या चीनच्या बाजारपेठेतून काढता पाय घेतील, असा इशारा काही चिनी जनता देत आहे. याआधीच बड्या कंपन्यांनी चीनमधील आपले कारखाने बंद करून भारत, बांगलादेश, व्हिएतनाम या चीनच्या शेजारी देशांमध्ये तळ हलविले आहे. जपानने देखील चीनमध्ये कारखाने टाकलेल्या आपल्या कंपन्यांसाठी आकर्षक सवलतींची घोषणा केली होती.

जगभरात चीनची प्रतिमा प्रेमळ व विनम्र देश अशी करा, असा संदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी आपल्या राजनैतिक अधिकार्‍यांना दिला होता. पण कोरोनाची साथ, हाँगकाँगमधील कायदा, उघुरवंशियांवरील अत्याचार, तैवानला दिल्या जाणार्‍या धमक्या व साऊथ चायना सीमधील विस्तारवादी कारवाया यामुळे चीनच्या राजवटीबद्दल जगभरात नाराजीचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील चीनची प्रतिमा नकारात्मक व डागाळलेली असल्याचे गेल्याच आठवड्यात एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणातून उघड झाले होते.

दरम्यान, कम्युनिस्ट पक्षाचे सर्वाधिकार एकवटलेल्या जिनपिंग यांना पक्षातूनच विरोध होईल, आव्हान मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. कोरोनाची साथ चीनने पसरविल्याचे पुरावे जगासमोर आले, तर चीनमध्ये थेट नेतृत्त्वबदल होईल, असा दावा विख्यात विश्‍लेषक गॉर्डन चँग यांनी केला होता. अशा परिस्थितीत, चीनच्या अंतर्गतही जिनपिंग यांच्या वाढत्या एकाधिकारशाही विरोधात आणि कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात नाराजी वाढत असल्याचे समोर आले आहे.

leave a reply