भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा सुरु

लेह – गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर पहिल्यांदाच भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकांऱ्याची चर्चा पार पडली. सोमवारी अकरा तासाहून अधिक काळ चाललेल्या या चर्चेतून फारसे काही निष्पन्न झालेले नसले तरी चिनी जवानांनी या क्षेत्रातून संपूर्ण माघार घेतल्याखेरीज तणाव निवळणार नाही, याची जाणीव भारतीय लष्कराने करुन दिली आहे. तसेच आधीच्या चर्चेत माघार घेण्याचे मान्य करुन त्यानंतर भारतीय सैनिकांवर हल्ला चढविणाऱ्या चीनने भारताचा विश्वास गमावलेला आहे, असे भारताकडून या चर्चेत बजावण्यात आले आहे. म्हणूनच ही चर्चा सुरु असताना भारताने पर्वतीय क्षेत्रातील युद्धासाठी विकसित केलेल्या ‘माऊटंन बिग्रेड’ची तैनाती चीनलगतच्या सीमाभागात करण्यात येत आहे. याबरोबरच लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि जमिनीवरुन हवेत मारा करणारी हवाई सुरक्षा यंत्रणा देखील चीनलगतच्या सीमेवर तैनात करण्यात आली आहे. लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे लडाखला भेट देऊन इथल्या सुरक्षेचा आढावा घेणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. Indian and Chinese military officers                    

भारताचे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग आणि चीनचे लेफ्टनंट जनरल लिन लिऊ यांच्यात सोमवारी ११ तासांहून अधिक काळ चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही बाजूंनी माघार घेण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. पण भारताने या चर्चेत अतिशय आक्रमक भूमिका घेऊन चीनलगतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एप्रिल महिन्याच्या आधीसारखी परिस्थिती प्रस्थापित व्हावी. त्याखेरीज तणाव निवळणार नाही असे बजावले आहे. त्याचवेळी माघार घेण्याचे मान्य करून त्यानंतर भारतीय लष्करावर हल्ले चढविणाऱ्या चीनच्या विश्वासघातावर कडाडून टीका करण्यात आल्याचे वृत्त आहे. यामुळे चीनने भारताचा विश्वास गमावला आहे व यापुढे भारत चीनचा शब्दावर विश्वास ठेवायला तयार होणार नाही. भारताचा विश्वास संपादन करण्यासाठी चीनला बरेच काही करावे लागेल ,असे या चर्चेत चीनला खडसावण्यात आल्याचे भारतीय माध्यमांनी म्हटले आहे.   

चीनबरोबर चर्चा सुरु असतानाच पर्वतीय क्षेत्रातील युद्धात पारंगत असणारी भारतीय लष्कराच्या ‘माऊंटन ब्रिगेड’ची तैनाती सीमाभागात करण्यात आली आहे. गलवानमधील चकमकीनंतर चीनने भारताच्या सीमेजवळ प्रचंड प्रमाणात लष्करी तैनाती करुन दडपण टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्याच प्रमाणात सीमेवर तैनाती करुन भारताकडून चीनला उत्तर दिले जात आहे. याबरोबरच भारताने लढाऊ विमाने व हवाई सुरक्षा यंत्रणा देखील तैनात केली आहे. दोन्ही देशांकडून सुरु असलेली ही जय्यत तयारी कुठल्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकतो, असे संकेत देत आहे. याआधी भारताचे लष्करी सामर्थ्य चीनच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे टोले लगावणाऱ्या चीनच्या सरकारी माध्यमांना देखील भारताच्या या तयारीची दखल घेणे भाग पडत आहे. दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर खडे ठाकलेले असताना चिनी लष्कराचा आत्मविश्वास खचविणारी गलवान व्हॅलीतील संघर्षाची माहिती प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार चीनचे ४० हून अधिक जवान ठार झाले व चीनच्या कर्नलला पकडून भारतीय सैनिकांनी आपल्या ताब्यात ठेवले होते, हे ही उघड झाले आहे. या चिनी कर्नलची सुटका करण्यात आली असली तरी यामुळे संर्घषात भारतीय सैनिकच वरचढ ठरले, हे उघड झाले आहे. पूर्ण तयारीनिशी हल्ला चढविणाऱ्या व संख्येने कितीतरी अधिक असणाऱ्या चीनच्या जवानांना भारतीय सैनिक पुरुन उरले.

चीनच्या जवानांना इथून पळ काढावा लागला, ही बाब समोर आली आहे. भारतापेक्षा अधिक संख्येने आपले जवान ठार झाले, हे मान्य करावे लागू नये म्हणून चीनने ठार झालेल्या आपल्या जवानांची संख्या उघड केली नाही. यावर चीनच्या सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे.   भारताने या संघर्षात शहीद झालेल्या आपल्या सैनिकांना सन्मान दिला. पण चीनने तसे केले नाही, यावर चिनी नेटकर नाराजी व्यक्त करीत आहेत. त्याचवेळी चीनचे लष्कर पूर्णपणे अव्यावसायिक व लढण्याची क्षमताच नसलेले आहे, असा दावा भारताचे माजी लष्करी अधिकारी करीत आहेत. 

भारताच्या सैनिकांनी गलवान व्हॅलीमध्ये घडविलेली ही अद्दल चीनच्या कायम लक्षात राहील , असेही माजी लष्करी अभिमानाने सांगत आहेत. त्याचवेळी जबर जखमी होऊन सुध्दा कर्नल संतोष बाबू आपल्या सहकांऱ्यासह इथे लढत राहिले व त्यांनी इथून माघार घेण्यास नकार दिला. तर चिनी लष्कराचा अधिकारी भारतीय सैनिकांकडून पकडला गेला. या विरोधाभासामुळे दोन्ही देशांच्या सैन्यांमधला तफावत लक्षात येईल, असे भारताचे माजी लष्करी अधिकारी स्पष्ट करीत आहेत.

leave a reply