भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ४ लाख ४० हजारांवर

नवी दिल्ली/मुंबई – देशात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या १४ हजारांजवळ पोहोचली असून एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ४० हजारांवर गेली आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडू या तीन राज्यातच ९ हजार ३०० हून अधिक रुग्णांची सोमवारच्या एका दिवसात नोंद झाली. तसेच कर्नाटक, तेलंगणा आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.

Corona-Indiaसोमवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशात ४४५ कोरोना रुग्ण दगावले, तर १४,८२१ नवे रूग्ण आढळले. यामुळे देशातील कोरोनाच्या बळींची संख्या १३,६९९ वर पोहोचली, तर या साथीच्या एकूण रुग्णांची संख्या सव्वा चार लाखांच्या पुढे गेली. रात्रीपर्यंत देशातील या साथीच्या बळींची संख्या १४ हजारांनजीक आणि एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ४० हजारांजवळ पोहोचल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्रात ११३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला मुंबईत ६६ जण दगावले. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३६ हजारांवर पोहोचली आहे.

दिल्लीतील रुग्ण संख्या ६२ हजारांच्या पुढे गेली आहे. सोमवारी दिल्लीत ५९ जणांचा या साथीने बळी गेला आणि २९०९ नवे रुग्ण आढळले. तामिळनाडूतील रुग्ण संख्याही ६२ हजारांच्या पुढे गेली असून या राज्यात चोवीस तासात २७१० नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत शहरांमधून या साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत होते. मात्र आता ग्रामीण भागातही रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढल्याचा अहवाल आहे. आतापर्यंत ९८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता वाढल्या आहेत.

दरम्यान, जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. काही देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती सतावत आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यावर अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये या साथीचे नवे रुग्णांच्या नोंदीत मोठी वाढ झाली. जगभरात रविवारी जेवढे नवे रुग्ण सापडले त्यातील २० टक्के नवे रुग्ण एकट्या अमेरिकेत आढळले आहेत. अमेरिकेत ३४ हजाराहून अधिक रुग्ण एका दिवसात आढळले. ब्राझीलमध्येही तितकेच नवे रुग्ण आढळले आहेत.

leave a reply