अमेरिका व इराण यांच्यातील अणुकरारावरील चर्चा फिस्कटली

दोहा/वॉशिंग्टन/तेहरान – 2015 सालचा अणुकरार वाचविण्यासाठी अमेरिका व इराणने नव्याने सुरू केलेल्या वाटाघाटी फिस्कटल्या आहेत. अणुकराराबाबतच्या मुद्यांवर इराणने साथ न दिल्यामुळे ही चर्चा अपयशी ठरली, असे खापर अमेरिकेने फोडले आहे. पण कुठल्याही परिस्थितीत इराण ‘रेड लाईन्स’चे उल्लंघन करण्यास तयार नाही, अशा स्पष्ट शब्दात इराणने अणुकराराबाबत अमेरिकेच्या मागण्यांसमोर झुकणार नसल्याचे ठणकावले. त्यामुळे नव्याने अणुकरार करण्याची शेवटची संधीही हुकल्याचा दावा केला जात आहे.

iran-us-doha-talkगेल्या वर्षी ज्यो बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर इराणबरोबर अणुकराराबाबत वाटाघाटी सुरू केल्या होत्या. सुमारे दहा महिने व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या या वाटाघाटी कुठल्याही ठोस निर्णयाशिवाय गणल्या होत्या. अशा परिस्थितीत, गेल्या आठवड्यात युरोपिय महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी इराणचा दौरा केला. यानंतर मंगळवारपासून कतारची राजधानी दोहा येथे युरोपिय महासंघाच्या मध्यस्थीने अमेरिका व इराणमध्ये नव्याने चर्चा सुरू झाली.

2015 सालचा अणुकरार वाचविण्यासाठी अमेरिका व इराणसमोर ही शेवटची संधी असल्याचा दावा पाश्चिमात्य माध्यमांनी केला होता. यासाठी इराणचे प्रतिनिधी अली बाघेरी कानी तर अमेरिकेचे विशेषदूत रॉबर्ट मॅली सहभागी झाले होते. तर मध्यस्थ म्हणून युरोपिय महासंघाचे एन्रीक मोआ या बैठकीत अमेरिका व इराणमध्ये अप्रत्यक्ष वाटाघाटी घडवित होते.

दोहा येथील दोन दिवसांच्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणबरोबरील वाटाघाटी अपयशी ठरल्याचे जाहीर केले. या अप्रत्यक्ष चर्चेसाठी युरोपिय महासंघाने घेतलेल्या प्रयत्नांचे अमेरिकेने स्वागत केले. पण इराणने आपली निराशा केल्याची टीका अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. अणुकरार यशस्वी करण्यासाठी इराणने साथ दिली नसल्याची तक्रार अमेरिका करीत आहे.

तर इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमिरअब्दोल्लाहियान यांनी आपला देश या वाटाघाटीबाबत अतिशय सकारात्मक होता, असे म्हटले आहे. तसेच या अणुकरारासाठी अमेरिकेचे हेतू वास्तववादी नव्हते, असा ठपकाही इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ठेवला. तर अमेरिकेबरोबरच्या अणुकरारासाठी इराण स्वत:च्या रेड लाईन्स ओलांडणार नाही, असे परराष्ट्रमंत्र्यांनी ठासून सांगितले.

अणुकरारासाठी अमेरिकेने इराणवरील सर्व निर्बंध माघारी घ्यावे. तसेच रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला अमेरिकेच्या दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळावे आणि या अणुकरारातून अमेरिका यापुढे माघार घेणार नाही याची हमी द्यावी, अशा मागण्या इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या होत्या. या मागण्यांवरुन अमेरिका व इराणमध्ये मतभेद झाल्याचा दावा केला जातो.

दरम्यान, अणुकराराबाबतची शेवटची संधी हुकल्यामुळे येत्या काळात अमेरिकेकडून इराणविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली जाऊ शकते. इस्रायल व सौदी अरेबिया यासाठी बायडेन प्रशासनावर दबाव टाकू शकतात.

leave a reply