एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री-देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदावर

मुंबई – गुरुवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

Eknath-shindeउद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. यानुसार गुरूवारी सायंकाळी राजभवानात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी पद व गोपनियतेची शपथ दिली.

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री बनले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे तळागाळातून आलेले नेते असून त्यांच्याकडे विधीमंडळ व प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री शिंदे आपल्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्राला अधिक उंचीवर नेण्याचे कार्य करतील, असा विश्वास पंतप्रधानांनी सोशल मीडियावरील आपल्या अभिनंदनपर संदेशात व्यक्त केला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनुभव व कौशल्य या सरकारसाठी महत्त्वाची बाब ठरेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

सातारामध्ये जन्म झालेले एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातूनच आपली राजकीय कारकिर्द सुरू केली होती. 1997 साली ठाणे महानगर पालिकेत नगरसेवक बनलेले एकनाथ शिंदे पुढच्या काळात चार वेळा आमदार बनले. महाराष्ट्राचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास हे आपले ध्येय असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. तसेच आपण रखडलेले प्रकल्प मार्गी लावणार असल्याची घोषणा नव्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

leave a reply