अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून उडत्या तबकड्यांच्या अभ्यासासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना

वॉशिंग्टन – परग्रहवासिय व उडत्या तबकड्यांसंदर्भात गेल्या काही वर्षांत सातत्याने समोर येणाऱ्या माहितीच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने एका विशेष ‘टास्क फोर्स’ची स्थापना केली आहे. अमेरिकेचे उपसंरक्षणमंत्री डेव्हिड नॉर्क्विस्ट यांनी, ‘द अनआयडेंटिफाईड एरियल फेनॉमेना टास्क फॉर्स’च्या(यूएपिटीएफ) स्थापनेची घोषणा केली आहे. त्यात संरक्षण विभागाबरोबरच ‘ऑफिस ऑफ नेव्हल इंटेलिजन्स’चा सहभाग असणार आहे. अज्ञात उडत्या तबकड्यांपासून अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याची माहिती, संरक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात देण्यात आली. २०१७ साली अमेरिकेच्या संरक्षण विभागाने पहिल्यांदाच उडत्या तबकड्यांसंदर्भात संशोधन सुरू असल्याची अधिकृत कबुली दिली होती.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून उडत्या तबकड्यांच्या अभ्यासासाठी 'टास्क फोर्स'ची स्थापनाशुक्रवारी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने ‘यूएपिटीएफ’च्या स्थापनेची माहिती देणारे निवेदन प्रसिद्ध केले. ‘उडत्या तबकड्यांचे मूळ, त्यांची रचना व त्यांच्या हालचाली यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी संरक्षण विभागाने यूएपिटीएफची उभारणी केली आहे. उडत्या तबकड्यांच्या हालचाली अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरू शकतात, याची जाणीव ठेवून त्यांची योग्य माहिती ठेवणे व अभ्यास करणे हे टास्क फोर्सचे उद्दिष्ट असेल. अमेरिकेच्या हवाई हद्दीत यापूर्वी उडत्या तबकड्यांसंदर्भातील घटनांची नोंद झाली असल्यास त्याचीही योग्य माहिती टास्क फोर्स घेईल’, असे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने स्पष्ट केले.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात, अमेरिकेच्या नौदलाने पहिल्यांदाच उडत्या तबकड्यांचे (अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट) प्रसिद्ध झालेले व्हिडीओ खरे असल्याची कबुली दिली होती. ‘टॉम डिलॉंज’, ‘टू द स्टार्स ऍकॅडमी ऑफ आर्टस् ऍण्ड सायन्स’ आणि ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ यांनी एकत्र येऊन २०१७ व २०१८ साली सदर व्हिडिओ प्रदर्शित केले होते. त्यानंतर अमेरिकेचे माजी सिनेटर हॅरी रीड यांनी या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली होती. ‘पेंटॅगॉन’ने याबाबत स्वतंत्र चौकशीही सुरू केल्याचे उघड झाले होते. या मुद्यावर अमेरिकेच्या संरक्षण विभागाने संसदीय समितीच्या निवडक सदस्यांना माहिती दिल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते.

अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून उडत्या तबकड्यांच्या अभ्यासासाठी 'टास्क फोर्स'ची स्थापनात्यापाठोपाठ यावर्षी एप्रिल व मे महिन्यात संरक्षण विभाग तसेच अमेरिकी नौदलाकडून उडत्या तबकड्यांचे (अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट) तब्बल ११ व्हिडीओज व तपशील प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यात संरक्षण विभागाच्या तीन तर नौदलाकडून प्रदर्शित करण्यात आलेल्या आठ व्हिडिओजचा समावेश आहे. या व्हिडीओजमध्ये २००४, २०१३, २०१४ व २०१५ साली घडलेल्या घटनांची माहिती आहे. बहुतांश घटना अमेरिकेच्या व्हर्जिनिया व नॉर्थ कॅरोलिना या राज्यांच्या सागरी हद्दीनजिक घडल्याचे सांगण्यात आले होते. काही घटनांमध्ये वैमानिकांनी ‘ड्रोन’ तसेच क्षेपणास्त्रांच्या आकाराची वस्तू आढळल्याचे म्हटले होते.

डिसेंबर २०१७ मध्ये, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने पहिल्यांदाच पृथ्वीवर आढळलेल्या उडत्या तबकड्यांच्या घटनांची चौकशी सुरू केल्याची कबुली दिली होती. अमेरिकेतील माजी गुप्तचर अधिकारी लुईस एलिझोन्दो यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर संरक्षण विभागाला ही कबुली देणे भाग पडले होते. त्यावेळी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने २००७ ते २०१२ या कालावधीत, उडत्या तबकड्यांच्या अभ्यासासाठी ‘ॲडव्हान्सड् एव्हिएशन थ्रेट आयडेंटिफिकेशन प्रोग्राम'(एएटीआयपी) राबविल्याची माहिती दिली होती. तर गेल्या वर्षी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘फॉक्स न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, उडत्या तबकड्यांच्या (अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट) प्रश्‍नावर उत्तर देताना, आपला त्यावर विश्‍वास नाही, पण काहीही शक्य आहे, असे वक्तव्य केले होते.

या सर्व पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या संरक्षण विभागाने उडत्या तबकड्यांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र टास्क फोर्सची स्थापना करणे लक्ष वेधून घेणारी घटना ठरते. ही घटना उडत्या तबकड्या व परग्रहवासियांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणेल, असे संकेत मिळत आहेत.

leave a reply