पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात सिंध जनतेची अमेरिकेत निदर्शने

वॉशिग्टंन – पाकिस्तानातील सिंधी, बलोच, पश्तून नागरीकांच्या अधिकारांच्या मागणीसाठी जगभरात निदर्शने सुरू असून अमेरिकेतील पाकिस्तानच्या दूतावाबाहेर देखील अशीच निदर्शने पार पडली. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी ‘सिंधी फाऊंडेशन’ या अमेरिकेतील गटाने पाकिस्तानी राजदूतांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निर्दशने केली. पाकिस्तानी सुरक्षादल सिंधी जनतेवर अत्याचार करीत असल्याचा आरोप या निदर्शकांनी यावेळी केला. तर या निदर्शनात सहभागी झालेल्या बलोच नागरीकांनी स्वतंत्र बलोचिस्तानच्या घोषणा दिल्या.

पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात सिंध जनतेची अमेरिकेत निदर्शनेपाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सिंधी, बलोच, पश्तून आणि गिलगिट-बाल्टिस्तानमधील नागरिकांनी जगभरात ’ब्लॅक डे’ साजरा केला. यावेळी पाकिस्तानच्या सिंध प्रांतात इम्रान खान सरकार तसेच लष्कर आणि आयएसआय यांच्याकडून केल्या जाणार्‍या कारवाईवर ताशेरे ओढण्यात आले. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने कराचीमधून ‘सारंग जोया’ या सिंधी नेत्याचे अपहरण करण्यात आले. पाकिस्तानात लोकशाही शिल्लक राहिली नसून पाकिस्तानची न्यायव्यवस्था लष्कर आणि ’आयएसआय’च्या विरोधात चकार शब्द काढायला तयार नसल्याचा आरोप जोया यांच्या कुटुंबियांनी केला. गेल्या सात आठवड्यात पाकिस्तानमधून ९२ जणांचे अपहरण झाले आहे. सरकार व लष्कराविरोधात आवाज बुलंद करणार्‍यांचा यात समावेश असून पाकिस्तानचे सुरक्षादल आपल्या विरोधकांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप केला जातो.

पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात सिंध जनतेची अमेरिकेत निदर्शनेअमेरिकेतील सिंधी गटाने देखील याची दखल घेत, पाकिस्तानच्या सरकार व लष्कराविरोधात निदर्शने पुकारली होती. अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत असाद माजिद खान यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या या निदर्शनात पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करण्याची मागणी केली. ‘जोपर्यत अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रसंघ पाकिस्तानला दहशतवादी देश घोषित करीत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानच्या विरोधातील निदर्शने कायम राहतील’, अशा घोषणा निदर्शकांनी दिल्या. या निदर्शनांमध्ये बलोच, पश्तून त्याचबरोबर गिलगिट बाल्टिस्तानचे नागरिकही सहभागी झाले होते. पाकिस्तानातील चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाविरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. ’चीन पाकिस्तानच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणात ढवळाढवळ करीत आहे. जगासाठी ही धोक्याची घंटा आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानवर लक्ष केंद्रित करावे’, याकडे गिलगिट बाल्टिस्तानच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्य वेधले.

दरम्यान, आपल्या देशात स्वातंत्र्य उरले नसल्याची टीका पाकिस्तानातील काही विश्लेषक व पत्रकार करू लागले आहेत. पाकिस्तानी पत्रकार मारवी सिरमेद यांनी आपल्या देशातील अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचारावर संताप व्यक्त केला. ’७३ वर्षानंतरही पाकिस्तान स्वातंत्र्यासाठी धडपडत आहे. खैबर-पख्तुनवाला, बलोचिस्तान, सिंध, गिलगिट-बाल्टिस्तान, पाकव्याप्त काश्मीर, माध्यमे आज कुणीही पाकिस्तानात स्वतंत्र नाही. हजारो जण आजही बेपत्ता आहेत’, याची जाणीव पत्रकार मारवी सिरमेद यांनी करुन दिली.

leave a reply