तौक्ते चक्रीवादळाची तीव्रता वाढली

नवी दिल्ली – लक्षद्विपजवळ निर्माण झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. या वादळासाठी सध्या पोषक वातावरण अरबी समुद्रात असून यामुळे हे वादळ अधिकाधिक जोर पकडत असल्याचे हवामानखात्याने म्हटले आहे. तसेच येत्या काही तासात या वादळाची तीव्रता आणखी वाढेल. सुमारे १५० किलोमीटर प्रतितास इतक्या प्रचंड वेगाने वारे वाहतील व या वादळाचे प्रचंड शक्तीशाली वादळात रुपांतर होईल, असा इशारा हवामानखात्याने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चक्रीवादळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला. तसेच या पार्श्‍वभूमीवर केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलांची (एनडीआरएफ) सुमारे १०० पथके तैनात करण्यात आली आहेत.

‘तौक्ते’ चक्रीवादळाची तीव्रता वाढलीकमी दाबाच्या पट्ट्यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे गेल्या दोन दिवसांपासून केरळच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. केरळ किनारपट्टीभागात मोठ्या लाटा धडकत असून किनारपट्टीवर काही भागांमध्ये जमीन व रस्ते खचल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच समुद्राचे पाणी शिरल्याने, जोरदार वार्‍यामुळे कित्येक घरांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकातही किनारपट्टीकडील जिल्ह्यांमध्ये शनिवारी जोरदार पाऊस झाला.

याआधी ‘तौक्ते’ चक्रीवादळात वार्‍याचा वेग ६० ते ७० किलोमीटर प्रतितास इतका राहील, अशी शक्यता हवामानखात्याने वर्तविली होती. मात्र शनिवारी हवामानखात्याने आपल्या अंदाजात सुधारणा केली. या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढल्याचे हवामानखात्याने म्हटले आहे. तसेच येत्या काही तासात या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढलेली असेल असा दावा हवामानखात्याने केला आहे. सध्या अरबी समुद्रातील तापमान व इतर गोष्टी या चक्रीवादळासाठी पोषक बनल्या असून हे वादळ अधिकाधिक तीव्र व शक्तीशाली बनत असल्याचा अंदाज हवामानखात्याने व्यक्त केला.‘तौक्ते’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली

हवामानखात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार ‘तौक्ते’ चक्रीवादळ १८ मे रोजी गुजरातच्या पोरबंदर ते नालियादरम्यान किनारपट्टीवर धडकेल. यावेळी या वार्‍याचा वेग १५० किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो, असा इशारा हवामानखात्याने दिला आहे.

१९९८ साली गुजरात किनारपट्टीला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला होता. १६५ किलोमीटर वेगाने वारे वाहिले होते. गुजरातच्या कांडलामध्ये हे चक्रीवादळ धडकले होते. या चक्रीवादळात सुमारे १० हजार जणांचा बळी गेल्याचा अंदाज आहे. तसेच ११ हजार प्राण्यांचा मृत्यू झाला होता. याशिवाय दीड लाखांहून अधिक घरे, इमारती व प्रकल्पांचे नुकसान झाले होते. हा नुकसानीचा आकडा सुमारे १२० अब्ज रुपयांहून अधिक होता.‘तौक्ते’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली

‘तौक्ते’ चक्रीवादळ १९९८ सालच्या चक्रीवादळाच्या मार्गानेच पुढे सरकत असून त्याचप्रमाणे भयंकर रुप घेत असल्याचे हवामानखात्याच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. यामुळे गुजरातमध्ये या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. याआधी गोवा, कोकण किनारपट्टीवरही या चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस आणि तुफानी वारा सुटणार असून यामुळे झाडे, वीजेचे खांब कोसळण्याच्या घटना घडू शकतात. तसेच कच्च्या घरांचे नुकसान होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीवर चार ते पाच मीटर उंच लाटा धडकू शकतात. त्यामुळे किनारपट्टी क्षेत्रात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळाची तीव्रता वाढलीगेल्या काही वर्षांपासून उत्तर हिंदी महासागर क्षेत्रात चक्रीवादळांची निर्मिती अधिक प्रमाणात होऊ लागली आहे. यामागे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जाते. अरबी समुद्री क्षेत्र हे बंगालच्या उपसागराच्या मानाने थंड मानले जाते. त्यामुळे चक्रीवादळाची निर्मिती अरबी समुद्री क्षेत्रात कमी होते. मात्र येथेही समुद्री तापमान वाढत असल्याचे लक्षात आले असून वर्षाला चार ते सहा वादळांची निर्मिती होत आहे. गेल्यावर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला होता. तसेच यानंतर गाटी, निवार, बुरेव्ही चक्रीवादळाची निर्मिती हिंदी महासागर क्षेत्रात झाली आहे. मात्र ही वादळे भारतीय किनारपट्टीवर धडकली नव्हती.

उत्तर हिंदी महासागर क्षेत्रात चक्रीवादळांचे सर्वाधिक प्रमाण २०१९ सालात आढळून आले होते. सुमारे १२ चक्रीवादळांची नोेंद करण्यात आली होती. यातील पबुक, फानी, वायु, हिक्का, ख्यार, महा, बुलबुल या वादळांचा तडाखा भारतीय किनारपट्टीला कमीजास्त प्रमाणात बसला होता. यातील हिक्का, महा, ख्यार या चक्रीवादळांचा प्रभाव भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवर दिसून आला होता. दरम्यान ‘तौक्ते’ हे चक्रीवादळाचे नाव म्यानमारी असून याचा अर्थ आवाज करणारी पाल असा होतो.

leave a reply