तेहरिक-ए-तालिबानने क्वेट्टामध्ये घडविलेल्या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानचे चार जवान ठार

क्वेट्टा – बलोचिस्तानची राजधानी क्वेटामध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे चार जवान ठार झाले. यातील जखमींची संख्या २० वर गेल्याची माहिती दिली जाते. ‘तेहरिक-ए-तालिबान’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तसेच या हल्ल्यात आपण पाकिस्तानच्या ३० जवानांना ठार केल्याचा दावा ‘तेहरिक’ने केला आहे.

बलोचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेटा शहरापासून २५ किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या मस्तंग रोडवरील पाकिस्तानी ‘फ्रंटियर कॉर्प्स’च्या चौकीला आत्मघाती हल्लेखोराने लक्ष्य केले. मोटरसायकलवर सुमारे सहा किलो इतकी स्फोटके लादून आत्मघाती हल्लेखोराने ही मोटरसायकल लष्करी वाहनावर आदळविली. यावेळी झालेल्या स्फोटात चार पाकिस्तानी जवान ठार तर वीसजण जखमी झाले. जखमींमधील काहीजणांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. ‘तेहरिक’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर, तेहरिक-ए-तालिबानने पहिल्यांदाच अशारितीने घातपाताची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र या आत्मघाती हल्ल्याचा निषेध करताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी यामागे परदेशी शक्ती असल्याचा आरोप केला. त्यांचा रोख भारताकडे असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर, इथून पाकिस्तानच्या विरोधात कारवाया करणार्‍या भारताची गुप्तचर संस्था निष्प्रभ होईल, असे दावे पाकिस्तानने केले होते. तसेच अफगाणिस्तानातील भारताचे दूतावास पाकिस्तानात घातपात माजविण्यासाठी वापरले जात आहेत, असा आरोपही पाकिस्तानने केला होता. पण आता अफगाणिस्तानातील भारताचे दूतावास बंद आहेत. तरीही पाकिस्तानात होत असलेल्या या बॉम्बस्फोटाला भारत कसा काय जबाबदार असू शकतो, याचे उत्तर पाकिस्तानकडे नाही.

दरम्यान, पाकिस्तानच्या विरोधी पक्षनेत्यांनी या घातपाताला इम्रान खान यांच्या सरकारला जबाबदार धरले आहे. अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार यावे व या सरकारला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी, यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. पण तालिबान मात्र पाकिस्तानात घातपात घडविणार्‍या तेहरिकच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या हवाली करण्यास तयार नाही. तसेच या दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार्‍या पाकिस्तानला तालिबानने नकार दिला होता.

यामुळे तालिबान आणि तेहरिक या दोन वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही, हा पाकिस्तानचा दावा निकालात निघाला आहे. तालिबानच्या अफगाणिस्तानातील विजयानंतर पाकिस्तानात घातपाताचे प्रमाण भयावहरित्या वाढले आहे, याकडे काही पाकिस्तानी पत्रकार लक्ष वेधत आहेत.

leave a reply