भारत-चीन सीमेवरील तणाव टाळता आला असता

- भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाचा दावा

नवी दिल्ली,  (वृत्तसंस्था) –  सिक्कीमच्या सीमेत घुसखोरी करणाऱ्या चीनी जवानांना भारतीय सैनिकांनी अडविल्यानंतर इथे जोरदार झटापट झाली होती. यावेळी भारतीय लष्कराच्या लेफ्टनंटने चिनी मेजरला ठोसा मारुन जमिनीवर पाडले होते. याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर चीनने हे प्रकरण चिघळणार नाही, याची खबरदारी घेऊन अतिशय सावध प्रतिक्रिया दिली होती. सीमेवर सलोखा व सौहार्द कायम ठेवण्यावर त्यांचा भर राहिला आहे,असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. तर  गुरुवारी या घटनेवर प्रतिक्रिया नोंदविताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सीमेवरचा हा तणाव टाळता येऊ शकला असता, असे सूचक विधान केले आहे.                    

२०१८ व २०१९ साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत दोन्ही देशांच्या सीमेवरील तणाव कमी करण्यावर एकमत झाले होते. सीमेवरील सलोखा व सौहार्द कायम राखण्यासाठी प्रयत्न करण्याचेही दोन्ही नेत्यांनी मान्य केले होते. व त्यानुसार उभय देशांच्या लष्करामध्ये वाद सोडविण्यासाठी कार्यप्रणालीवर ही चर्चा झाली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्याची आठवण करून दिली आहे. तसेच भारत आणि चीनची सीमा  शांत असून येथे तणाव नाही, असा दावाही परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.  ही प्रतिक्रिया देत असतानाच दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेला संघर्ष देखील टाळता आला असता, असे विधान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.                                                        

चीनच्या जवानांनी घुसखोरी केली नसती तर ही वेळच ओढवली नसती, असे भारताचे परराष्ट्र मंत्रालय राजनैतिक परिभाषेत सांगत आहे.  या दरम्यान  भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी चीनच्या सीमेवरील अशा प्रकारचे संघर्ष ही काही नवी बाब नसल्याचे म्हटले आहे. दोन्ही देशांमधील एलएसी अर्थात ‘लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल’ बाबत उभय देशांचे  दृष्टीकोन भिन्न आहेत.  त्यामुळे इथे गस्त घालत असताना दोन्ही देशांचे सैनिक काही वेळेस एकमेकांसमोर येतात, असे जनरल नरवणे म्हणाले. त्याचवेळी आपण चीनलगतच्या सीमाभागाची पाहणी करून इथल्या  सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे, असेही लष्करप्रमुख पुढे म्हणाले.                              

या ठिकाणी तैनात असलेल्या भारतीय सैनिकांचे मनोबल अतिशय उच्च कोटीचे असल्याचे सांगून  लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी देशाची सीमा सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे. दरम्यान भारतीय लष्कर  पाकिस्तान आणि चीनच्या सिमेवर तसेच ‘आयबीजी’ अर्थात  ‘इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप’ तैनात करणार असल्याची घोषणा जनरल नरवणे यांनी केली होती. याबाबतची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र कोरोनाव्हायरसमुळे ही तैनाती लांबली ,अशी माहिती  लष्करप्रमुखांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. सिक्कीमच्या सीमेवर चिनी सैनिकांनी केलेल्या घुसखोरी नंतर जनरल नरवणे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया चीनला योग्य तो संदेश देणारी असल्याची चर्चा सुरू झाली होती.   

leave a reply