तालिबानमधील बरादर, हक्कानी गटातील तणाव वाढला

- इस्रायली दैनिकाचा दावा

काबुल – गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात तालिबानने ताबा घेतला होता. पण गेल्या कित्येक दशकांचा इतिहास पाहता, येत्या काळात तालिबानला अफगाणिस्तानात राजवट प्रस्थापित करून एकछत्री कारभार करणे अशक्य ठरेल, असा इशारा काही मोजक्या विश्‍लेषकांनी दिला होता. तालिबानच्या मुल्ला बरादर आणि सिराजुद्दीन हक्कानी यांच्यातील तणावाच्या बातम्या हा इशारा प्रत्यक्षात उतरत असल्याची बाब ‘टाईम्स ऑफ इस्रायल’ या दैनिकाने निदर्शनास आणून दिली.

गेल्या सहा महिन्यांपासून तालिबान अफगाणिस्तानातील आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण अंतर्गत कलह, वांशिक मतभेद तालिबानच्या राजवटीला हादरे देत असल्याचा दावा या इस्रायली दैनिकाने केला. यासाठी लोया कंदहार आणि लोया पाकतिया यांच्यातील तणावाचा दाखला सदर दैनिकाने दिला आहे. लोया कंदहारी अर्थात तालिबानच्या राजवटीचा उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर याच्या नेतृत्वाखालील गट. तर पाकिस्तान नियंत्रित सिराजुद्दीन हक्कानीचा हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेचा गट लोया पाकतिया म्हणून ओळखला जातो.

तालिबानच्या राजवटीत अंतर्गत सुरक्षामंत्री म्हणून घोषित सिराजुद्दीन हक्कानीचा गट जहाल पश्तू समर्थक आहे. हक्कानी नेटवर्कच्या धोरणांमुळे तालिबानच्या इतर गटांमध्ये काबुलमधील नेतृत्वाविरोधात अविश्‍वास वाढू लागल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर सिराजुद्दीन हक्कानी तालिबानच्या राजवटीत इतर वांशिक गटाच्या नेत्यांना स्थान देण्यात तयार नसल्याची बाब मुल्ला बरादरला खटकत आहे, याकडे टाईम्स ऑफ इस्रायलने लक्ष वेधले.

याआधी बरादर आणि हक्कानी गटांमध्ये तालिबानच्या नेतृत्वावरुन संघर्ष पेटला होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानात हक्कानी नेवटर्कच्या दहशतवाद्यांनी मुल्ला बरादरला धक्काबुक्की केली होती. त्यानंतर बरादर आणि हक्कानी नेटवर्कमध्ये संघर्ष पेटून काहीजण जखमी झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या घटनेनंतर बरादरने काही आठवड्यांसाठी काबुलशी संपर्क तोडला होता.

पण बरादर आणि हक्कानी नेटवर्कमधील या तणावाबरोबरच तालिबानमधील वांशिक मतभेदही समोर येत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात उत्तर अफगाणिस्तानात तालिबानमधील ताजिक आणि उझबेक गटांनी काही पश्तू गटातील सदस्यांना ताब्यात घेतले होते. पश्तू गटाच्या सदस्यांचा ‘आयएस’शी संबंध असल्याचा आरोप ताजिक व उझबेक गटांनी केला होता.

तर यावर्षी १३ जानेवारी रोजी अफगाणिस्तानच्या फरयाब प्रांतात तालिबानमधील प्रभावशाली उझबेक कमांडर मखदूम आलम रब्बानी याला हक्कानी गटाने अटक केली होती. मखदूम हा अपहरणकांडात गुंतलेला असून त्याने ३०० हून अधिक रायफल्स लपविल्याचा आरोप सिराजुद्दीन हक्कानीने केला होता. त्याच्या पुढच्या दिवशी सिराजुद्दीनने तालिबानमधील प्रभावशाली ताजिक कमांडर कारी वकिल यालाही ताब्यात घेतले होते.

या दोन्ही घटनांनंतर अफगाणिस्तानच्या उत्तर तसेच वायव्येकडील भागात तालिबानच्या ताजिक-उझबेक गटांनी हक्कानीच्या पश्तू गटाविरोधात बंड पुकारण्याची तयारी केली होती. सिराजुद्दीन हक्कानीने आत्मघाती हल्ल्यांसाठी तयार केलेल्या ‘बद्री युनिट’च्या ३०० दहशतवाद्यांना रवाना करून ताजिक-उझबेक गटांना इशारा दिला होता. यानंतर उत्तर अफगाणिस्तानातील तणाव निवळला. पण अजूनही तालिबानमधील ताजिक-उझबेक गटांमधील पाकिस्तान नियंत्रित हक्कानी गटाच्या विरोधातला असंतोष कमी झालेला नाही, असा दावा इस्रायली दैनिकाने केला आहे.

येत्या काळात हक्कानी नेटवर्कशी नाराज असलेले हे ताजिक-उझबेक गट उत्तर अफगाणिस्तानातील प्रभावी नेतृत्व अहमद मसूदच्या ‘नॉर्दन रेझिस्टन्स फ्रंट’ला सामील होऊ शकतात, अशी दाट शक्यता या इस्रायली दैनिकाने वर्तविली आहे.

leave a reply