अमेरिकेने युक्रेनऐवजी तैवानला प्राधान्य द्यावे

- विश्‍लेषकांचे आवाहन

वॉशिंग्टन/तैपेई – अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीकडे लक्ष देण्याऐवजी तैवानच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे, असे आवाहन विश्‍लेषकांनी केले आहे. अमेरिकेतील आघाडीचे दैनिक ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात हे आवाहन करण्यात आले.

युरोपमध्ये काय घडते याकडे लक्ष देण्यापेक्षा चीनला आशिया खंडात वर्चस्वाची क्षमता मिळविण्यापासून रोखणे हे जास्त महत्त्वाचे आहे, असा सल्ला लेखात देण्यात आला आहे. गेल्याच महिन्यात अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार लेफ्टनंट जनरल किथ केलॉग यांनी, राष्ट्राध्यक्ष बायडेन चीनच्या खर्‍या धोक्याचा मुकाबला करण्याऐवजी युक्रेनवर वेळ व शक्ती वाया का घालवित आहेत, असा सवाल केला होता.

अमेरिकेतील आघाडीचे दैनिक ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये ‘युक्रेन इज डिस्ट्रॅक्शन फ्रॉम तैवान’ या नावाने लेख प्रसिद्ध झाला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागातील माजी ‘डेप्युटी असिस्टंट सेक्रेटरी’ एल्ब्रिज कोल्बी व अमेरिकेच्या हवाईदलासाठी ‘स्ट्रॅटेजिक प्लॅनर’ म्हणून काम करणार्‍या ओरियाना मॅस्ट्रो यांनी हा लेख लिहिला आहे. रशिया-युक्रेन तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेने आता युरोपात लष्करी तैनाती करणे ही प्रशासनाची मोठी घोडचूक ठरेल, असे कोल्बी व मॅस्ट्रो यांनी बजावले आहे. पॅसिफिक क्षेत्रात चीनला रोखण्यासाठी अमेरिकेकडून जे प्रयत्न सुरू आहेत त्याला युरोपातील वाढीव तैनातीमुळे खीळ बसू शकते, याकडे अमेरिकी विश्‍लेषकांनी लक्ष वेधले.

‘इंडो-पॅसिफिक क्षेत्र खुले व मुक्त ठेवण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत व या प्रयत्नांची विश्‍वासार्हता कायम राखण्यासाठी तैवानचा बचाव करणे सर्वात महत्त्वाची बाब ठरते. तैवान हा पॅसिफिकच्या सुरक्षेचा पहिला टप्पा आहे आणि तैवान गमावला तर अमेरिकेला जपान व फिलिपाईन्ससारख्या देशांचा बचाव करणे अवघड जाईल. अमेरिका व अमेरिकेच्या प्रभावक्षेत्रात आपले लष्करी वर्चस्व दाखविण्याची संधी चीनला मिळेल’, असे कोल्बी व मॅस्ट्रो यांनी बजावले.

अमेरिका दुसर्‍या क्षेत्रांमध्ये गुंतून पडला तर तैवानची सुरक्षा करणे अमेरिकेसाठी अशक्य ठरेल. त्यामुळे तैवान हा युक्रेनपेक्षाही महत्त्वाचा आहे, याची जाणीव अमेरिकेच्या प्रशासनाला हवी, असा दावाही ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या लेखात करण्यात आला. अमेरिका युरोपात गुंतून पडल्यावर आपल्याला तैवान गिळण्याची संधी मिळेल, असे चीनला वाटता कामा नये. त्यासाठी बायडेन प्रशासनाने हालचाली करायला हव्यात, असा इशाराही कोल्बी व मॅस्ट्रो यांनी दिला.

रशिया-युक्रेनमधील तणावावर चीन बारीक लक्ष ठेऊन असून त्याचे परिणाम काय होतात, यावर चीन तैवानबाबत निर्णय घेऊ शकतो, अशा स्वरुपाचे दावेही माध्यमांमधून प्रसिद्ध होत आहेत. काही दिवसांपूर्वी चीनने युक्रेनच्या मुद्यावर नाटो व अमेरिकेवर टीका करून रशियाला समर्थन दिले होते. त्यापूर्वी रशिया व चीनच्या संयुक्त निवेदनात, तैवान हा चीनचा भाग असल्याचे रशियाने मान्य केले होते.

leave a reply