एलएसीवरील तणावाचा भारत-चीन संबंधांवर विपरित परिणाम होत आहे

- परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची चीनला समज

नवी दिल्ली/बीजिंग – एलएसीवर एकतर्फी बदल घडविण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. एलएसीवर दीर्घकाळापासून सुरू असलेल्या वादाचा विपरित परिणाम भारत व चीनच्या द्विपक्षीय संबंधांवर होत आहे, याची जाणीव भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना करून दिली. एससीओच्या बैठकीदरम्यान चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांच्यामध्ये पार पडलेल्या चर्चेत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनला ही समज दिली. त्यावर बोलताना चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी ‘अर्जंट ट्रिटमेंट’ अर्थात तातडीच्या उपाययोजनांची आवश्यकता मान्य केली व सामोपचाराने ही समस्या सोडविण्यासाठी आपला देश तयार असल्याचे म्हटले आहे.

एलएसीवरील तणावाचा भारत-चीन संबंधांवर विपरित परिणाम होत आहे - परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची चीनला समजताजिकिस्तानच्या दुशांबे येथे ‘एससीओ’च्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांच्या चर्चा झाली. एलएसीवर तणाम कायम ठेवून भारत व चीनमधील संबंध सुधारू शकणार नाहीत, असे जयशंकर यांनी पुन्हा एकदा बजावले. एलएसीवरील तणावाचा परिणाम भारत आणि चीनच्या संबंधांवर होत असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे, याकडे लक्ष वेधून जयशंकर यांनी चीनला वास्तवाची जाणीव करून दिली. सीमावाद कायम ठेवून देखील भारत व चीन परस्परांशी सहकार्य करू शकतात, असे सांगून चीन लडाखच्या एलएसीवरील आपल्या लष्करी हालचालींची तीव्रता कमी करू पाहत आहे. मात्र भारत चीनला तशी संधी उपलब्ध करून द्यायला तयार नाही, हे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबरील चर्चेत पुन्हा एकदा स्पष्ट केले.

लडाखच्या एलएसीवरील पेंगाँग सरोवर क्षेत्रातून चीनने आपले जवान मागे घेतले खरे. पण अजूनही पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग, गोग्रा आणि डेप्सांगमधून चीनच्या लष्कराने पूर्ण माघार घेतलेली नाही. या माघारी खेरीज एलएसीवरील तणाव निवळून इथे शांतता व सलोखा प्रस्थापित होणार नाही. दोन्ही देशांमधील संबंध सुरळीत होण्याची ही पूर्वअट ठरते, हे भारत चीनला सातत्याने सांगत आहे. मात्र चीनने हा आपल्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनविल्याचे दिसत आहे. या प्रकरणी वाटाघाटींनी मार्ग काढण्याची तयारी चीनच्या परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी दाखविली आहे. त्याचवेळी भारत व चीन परस्परांचे वैरी नसून भागीदार असल्याचा संदेश वँग ई यांनी दिला. एलएसीवरचा वाद सोडविण्यासाठी दोन्ही देशांना मान्य असलेली तडजोड करण्यास आपला देश तयार असल्याचे वँग ई यांनी यावेळी स्पष्ट केले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र एलएसीवरील तणावाला आपला देश जबाबदार नसल्याचे सांगून भारताच्या आक्रमकतेमुळे हा तणाव निर्माण झाल्याचे संकेत दिले आहेत. परराष्ट्रमंत्री वँग ई भारताबरोबर सलोखा प्रस्थापित करण्याचे व सहकार्याचे दावे करीत असले तरी चीन एलएसीवरील हा तणाव कमी करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.

लडाखच्या एलएसीवर चीनच्या तोडीस तोड तैनाती करून भारताने चीनचे दडपण झुगारून दिले होते. गेल्या वर्षी गलवानच्या खोर्‍यात झालेल्या संघर्षात भारतीय सैन्याची सरशी झाली होती, ही बाब सार्‍या जगाने मान्य केली आहे. इतकेच नाही तर एलएसीच्या इतर भागात घुसखोरी करून भारतावरील दबाव वाढविण्याची संधी चीनला भारतीय संरक्षणदलांनी मिळू दिलेली नाही. सामर्थ्यशाली देश म्हणून जगभरात आपली प्रतिमा उभारू पाहणार्‍या चीनला बसलेला हा फार मोठा धक्का ठरतो. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यामुळे अस्वस्थ झाले असून त्यांनी एलएसीवरील घडामोडी अत्यंत गांभीर्याने घेतल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच एलएसीची जबाबदारी आपल्या निकटवर्तीय लष्करी अधिकार्‍याकडे सोपविण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी घेतला होता. भारतावर दबाव टाकण्यात चिनी अधिकार्‍यांना मिळत नसलेल्या यशामुळे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग अस्वस्थ झाले असून त्यामुळे ते असे असे फेरबदल करीत असल्याची बाब यामुळे उघड झाली होती.

leave a reply