चिनी इंजिनिअर्सचा बळी घेणार्‍या स्फोटाबाबत पाकिस्तानचे परस्परविरोधी दावे

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनख्वातील बसमध्ये झालेल्या स्फोटात चीनचे नऊ इंजिनिअर्स ठार झाले होते. हा घातपात होता असा दावा पाकिस्तानच्या मंत्र्यांनी केला. पण पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय मात्र बसच्या एसीमध्ये स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याचा दावा करीत होते. अजूनही हा दहशतवादी हल्ला आहे, हे पाकिस्तान ठामपणे सांगायला तयार नाही. तर दुसर्‍या बाजूला चीन या घातपाताला जबाबदार असलेल्यांना कडक शासन करण्याची मागणी पाकिस्तानकडे करीत आहे. याच्या तपासासाठी पाकिस्तानमध्ये पथक पाठविण्याची तयारी चीनने केली आहे. मात्र हा स्फोट दुसर्‍या कुणी नाही, तर खुद्द पाकिस्ताननेच घडवून आणल्याने पाकिस्तानच्या दाव्यांमध्ये विरोधाभास दिसत असल्याचे आरोप काहीजण करीत आहेत.

पाकिस्तानातील बॉम्बस्फोटात चीनचे नऊ इंजिनिअर्स ठार - चीनने कठोर कारवाईची मागणी केलीखैबर-पख्तुनख्वा प्रांतातील अप्पर कोहिस्तानच्या दासू येथील जलविद्युत प्रकल्पावर चिनी इंजिनिअर्स काम करीत होते. त्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी लष्कराचे जवान देखील तैनात होते. असे असताना चिनी इंजिनिअर्स प्रवास करीत असलेल्या बसमध्ये बॉम्बचा स्फोट झाला आणि त्यात चीनचे नऊ इंजिनिअर्स ठार झाले. यात पाकिस्तानी लष्कराचे दोन जवान ठार झाल्याचे सांगितले जाते. सध्या पाकिस्तानची सारी मदार चीन गुंतवणूक करीत असलेल्या ‘सीपीईसी’ प्रकल्पावर आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानात कार्यरत असलेल्या चिनी नागरिकांच्या सुरक्षेकडे पाकिस्तानने अधिक संवेदनशीलतेने पाहणे अपेक्षित होते. असे असूनही सदर बॉम्बस्फोटाबाबत पाकिस्तान परस्परविरोधी दावे करीत असल्याचे दिसते.

पाकिस्तानचे मंत्री बाबर अवान यांनी हा घातपात असल्याचा आरोप केला. तर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही दुर्घटना असल्याचा निर्वाळा दिला होता. या बसच्या एसीमध्ये बिघाड झाला, त्याचा स्फोट होऊन बस हवेत उडाली आणि मग ती दरीत कोसळली, असे अजब दावे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एससीओच्या बैठकीत चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अशीच माहिती दिल्याचे सांगितले जाते. पण आता पाकिस्तानचे माहिती व प्रसारणमंत्री फवाद चौधरी यांनी हा घातपातच होता व त्यासाठी वापरल्या गेलेल्या स्फोटकांची माहिती मिळाल्याचे जाहीर केले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान स्वतःहून या घातपाताच्या तपासाची माहिती घेत आहेत, असेही फवाद चौधरी पुढे म्हणाले. यामुळे पाकिस्तानच्या भूमिकेवरील संशय अधिकाधिक वाढत चालला आहे. चीनने देखील हा घातपातच होता व पाकिस्तानने याला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच या घातपाताच्या तपासात सहभागी होण्यासाठी चीन आपले पथक पाकिस्तानला रवाना करणार आहे.

या घातपाताद्वारे चीन व पाकिस्तानमधील सीपीईसी प्रकल्पाला धक्का देण्याचा काही परकीय शक्ती प्रयत्न करीत असल्याचा आरोप पाकिस्तानच्या माध्यमांनी केला. तर भारताच्या सोशल मीडियावर मात्र हा घातपात पाकिस्ताननेच घडविला व चीनला धक्का देण्याचा हेतू यामागे होता, असा आरोप होत आहे.

पाकिस्तान व चीन कितीही मोठमोठे दावे करीत असले तरी सीपीईसी प्रकल्प सध्या सक्रीय नाही. यावरून दोन्ही देशांचे मतभेद टोकाला गेलेले आहेत. इतकेच नाही तर आपल्याला बाजूला सारून चीन अफगाणिस्तानात तालिबानशी हातमिळवणी करील, अशी चिंता पाकिस्तानला वाटत आहे. यासाठी चीनला धक्का देण्याची फार मोठी गरज पाकिस्तानला वाटू लागली असून हा बॉम्बस्फोट घडवून पाकिस्तानने चीनला इशारा दिल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. पाकिस्तान या स्फोटाबाबत करीत असलेले परस्परविरोधी दावे या आरोपांना अधिक बळ देत आहेत.

leave a reply