नायजेरियाच्या बोर्नो प्रांतातील दहशतवादी हल्ल्यात 23 जणांचा बळी

23 जणांचा बळीअबुजा – नायजेरियात ‘आयएस’संलग्न ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात 23 जणांचा बळी गेला आहे. गेल्या महिन्यात नायजेरियाच्या लष्कराने केलेल्या एका कारवाईत बोको हरामचे दोन कमांडर्स ठार झाले होते. त्याचा सूड घेण्यासाठी बोको हरामकडून संशयितांना लक्ष्य करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात बोको हरामने मोठा दहशतवादी हल्ला चढवून 50 जणांचा बळी घेतला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी नायजेरियातील एका प्रार्थनास्थळावर झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात 50हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेला हा तिसरा मोठा दहशतवादी हल्ला ठरला आहे.

मंगळवारी नायजेरियाच्या ईशान्य भागात असलेल्या बोर्नो प्रांतात बोको हरामच्या दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. दिकवा डिस्ट्रिक्ट भागातील मगडाला गावात गाड्या तसेच मोटरसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ले केले. दहशतवाद्यांच्या गटाने गावातील काहीजणांचे अपहरणही केले असून 20हून अधिक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. स्थानिक व्यापारी व नागरिक लष्कराला माहिती देत असल्याचा संशय असल्याने त्यांना लक्ष्य केल्याचा दावा माध्यमांनी केला.

23 जणांचा बळीनायजेरियात गेल्या 15 दिवसात झालेल्या हा तिसरा मोठा दहशतवादी हल्ला ठरला आहे. गेल्या महिन्यात बोर्नो प्रांतातील रान शहरातील व्यापाऱ्यांच्या गटाला लक्ष्य करण्यात आले होते. त्यात 50 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर रविवारी ओंडा प्रांतातील प्रार्थनास्थळावर हल्ला करून 53 जणांचा बळी घेतला होता. आता मंगळवारी पुन्हा एकदा मोठा हल्ला करून बोको हरामने आपली वाढती ताकद व क्रौर्य दाखवून दिले आहे.

नायजेरियात पुढील वर्षी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर होणारे वाढते दहशतवादी हल्ले विद्यमान राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बुहारी यांच्या पक्षासमोरील अडचणी वाढविणारे ठरु शकतात. या हल्ल्यांनी बुहारी यांच्या कार्यक्षमतेवर आधीच प्रश्नचिन्ह उभे राहिले असून विरोधी पक्षांनी आणीबाणी लागू करण्याची मागणी केली आहे.

आफ्रिकेतील नायजेरिया हा इंधनसंपन्न व सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. गेली काही वर्षे अल कायदा, आयएस संलग्न दहशतवादी संघटना तसेच बंडखोर गट आणि लुटारुंच्या टोळ्यांनी या देशाची सुरक्षा धोक्यात टाकली आहे. सातत्याने कारवाया करूनही दहशतवादी तसेच सशस्त्र गटांवर नियंत्रण मिळविण्यात सरकारला यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर देशाचे स्थैर्य धोक्यात आल्याचा ठपका विरोधकांनी ठेवला आहे.

leave a reply