सिरियासाठी निघालेल्या इराणच्या इंधनवाहू टँकर्सवर दहशतवादी हल्ला

- सिरियन पंतप्रधानांचा दावा

तेहरान – सिरियासाठी इंधन घेऊन निघालेल्या इराणच्या टँकर्सवर ‘रेड सी’च्या सागरी क्षेत्रात दहशतवादी हल्ला झाल्याचा आरोप सिरियाचे पंतप्रधान हुसेन अरनौस यांनी केला. या हल्ल्यासाठी सिरियन पंतप्रधानांनी कुणालाही जबाबदार धरलेले नाही. पण या हल्ल्यामुळे सिरियाला होणार्‍या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याची टीका पंतप्रधान अरनौस यांनी केली. दरम्यान, सिरियाच्या होम्स येथील बंदरात इंधनाच्या टॅकरमध्ये स्फोट होऊन मोठा आगडोंब उसळला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सिरिया इंधनासाठी इराणवर अवलंबून आहे. आपल्या देशातील इंधनाची मागणी पूर्ण करण्यासाठी सिरिया इराणकडून इंधनाची आयात करीत आहे. गेल्या आठवड्यात सिरियासाठी सात टँकर्स इंधन घेऊन निघाले होते. पण ‘रेड सी’च्या पट्ट्यात येताच यापैकी दोन जहाजांवर दहशतवादी हल्ला झाला, असा आरोप सिरियन पंतप्रधानांनी केला. या दोन्ही जहाजांमध्ये एकूण २० लाख बॅरेल्सपर्यंत इंधनाचा साठा असल्याचा दावा केला जातो. या दोन्ही जहाजांवर केलेल्या कारवाईमुळे सिरियाला मिळणार्‍या इंधनात विलंब झाल्याची तक्रार पंतप्रधान अरनौस करीत आहेत.

सिरियाच्या पंतप्रधानांनी ‘रेड सी’मधील कारवाईसाठी थेट कुणावरही आरोप केलेला नाही. पण इराण व सिरिया विरोधक गट किंवा देश या हल्ल्याला कारणीभूत असल्याचा दावा सिरियन माध्यमे करीत आहेत. इराणच्या इंधन टँकर्सवर झालेल्या हल्ल्याची माहिती समोर येत नाही तोच बुधवारी सिरियाच्या होम्स प्रांतात मोठी दुर्घटना घडली. येथील इंधनाच्या टँकमध्ये उपसा करणार्‍या टँकर्सना आग लागून प्रचंड स्फोट झाला. या आगीचे निश्‍चित कारण कळू शकलेले नाही. पण आत्ताच्या काळात इंधनाचा तुटवडा भासत असलेल्या सिरियासाठी ही मोठी आपत्ती ठरत आहे.

गेल्या काही वर्षांपासून अमेरिका आणि मित्रदेशांनी सिरियातील अस्साद राजवट व इराणवर निर्बंध लादले आहेत. याचा परिणाम सिरिया व इराण यांच्यातील इंधन व्यवहारांवर झाला आहे. तरी देखील या दोन्ही देशांमध्ये इंधनाचे व्यवहार सुरू आहेत. सिरियाची अर्थव्यवस्था इंधनावर अवलंबून असल्याचा दावा केला जातो.

सिरिया हा इंधनसंपन्न देश आहे. या देशात आजच्या घडीला २५० कोटी बॅरेल्स इंधनाचा साठा असल्याचा दावा केला जातो. २००८ सालापर्यंत सिरिया प्रतिदिनी चार लाख बॅरेल्स इतका इंधनाचा उपसा करीत होता. पण २०११ साली सिरियामध्ये भडकलेले गृहयुद्ध आणि त्यानंतर ‘आयएस’ व इतर दहशतवादी संघटनांमधील संघर्षामुळे सिरियातील इंधननिर्मिती प्रभावित झाली. त्याचबरोबर सिरियाच्या उत्तरेकडील भागात असलेल्या इंधनाच्या विहिरी व प्रकल्पांचा ‘आयएस’ त्याचबरोबर तुर्कीसंलग्न दहशतवादी संघटनांनी ताबा घेतल्यानंतर या देशातील इंधनाचा उपसा कमी झाला. सध्या सिरियातून प्रतिदिनी ३४ हजार बॅरेल्सचा उपसा केला जातो.

leave a reply