सिरियातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये १३ जणांचा बळी

दमास्कस – गेल्या चोवीस तासात सिरियाच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये १३ जणांचा बळी गेला तर ३५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमुळे सिरियात ‘आयएस’ पुन्हा जोर पकडू लागल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर सिरियातील अस्साद राजवटीचे समर्थक आणि कुर्द संघटनांमध्ये संघर्ष भडकल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहे. दरम्यान, अमेरिकेने इराकमार्गे सिरियामध्ये आपले सैन्य व लष्करी वाहने घुसविल्याची माहिती समोर आली आहे.

रविवारी सिरियाच्या अलेप्पो प्रांतातील एजाझ आणि अल-बाब ही दोन शहरे दुहेरी बॉम्बस्फोटाने हादरली. सिरियातील मानवाधिकार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, एझाझ शहरात झालेल्या आत्मघाती हल्लेखोराने कारबॉम्बस्फोट घडविला. या हल्ल्यात सात जणांचा बळी गेला असून यामध्ये एका मुलीचा समावेश आहे. यानंतर एझाझपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या अल-बाब शहरात दहशताद्याने घडविलेल्या आणखी एका कारबॉम्बस्फोटात पाच जणांचा बळी गेला. या दोन्ही हल्ल्यांमध्ये सुमारे ३० जण जखमी झाले.

अलेप्पोतील या दोन्ही शहरांवर तुर्की संलग्न दहशतवादी संघटनांचे वर्चस्व होते. तर ‘आयएस’ने हे हल्ले चढविल्याचा दावा सिरियन यंत्रणा करीत आहेत. तर सिरियाच्या ईशान्येकडील देर अल-झोर प्रांतातील हसाकेह या शहरात सिरियातील अस्साद राजवटसमर्थक संघटना आणि कुर्दांमध्ये चकमक उडाली. यामध्ये एकाचा बळी तर चार जण जखमी झाले. या व्यतिरिक्त हवार शहरातील सिरियन लष्कराच्या सुरक्षा चौक्यांवर देखील हल्ले झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

गेल्या दोन आठवड्यांमध्ये सिरियामध्ये झालेला हा तिसरा दहशतवादी हल्ला ठरतो. या हल्ल्यांमुळे ‘आयएस’चे दहशतवादी पुन्हा एकदा सिरियामध्ये सक्रीय होत असल्याचा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे करू लागली आहेत. त्याचबरोबर सिरियन राजवट व संलग्न संघटना, तुर्की व तुर्कीसंलग्न गट आणि कुर्द बंडखोरांमध्येही संघर्ष पेटू लागल्याचे बोलले जाते. तर अमेरिकेने देखील सिरियामध्ये तैनाती सुरू केल्याच्या बातम्या सिरिया, इराणची माध्यमे देऊ लागली आहेत. अमेरिकेने अधिकृतरित्या याची घोषणा केलेली नाही.

दरम्यान, २०११ सालापासून सिरियात सुरू असलेल्या संघर्षात ३,८७,००० जणांचा बळी गेला आहे. तर लाखोजण विस्थापित झाले आहेत.

leave a reply