दहशतवादी पाकिस्तानला ‘एफएटीएफ’ने काळ्या यादीत टाकावे

- बलोच संघटनेची मागणी

नवी दिल्ली/ इस्लामाबाद – दहशतवाद पसरविणाऱ्या आणि अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या पाकिस्तानला ‘फायनान्शियल अँक्शन टास्क फोर्स’ने (एफएटीएफ) काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी ‘फ्री बलोचिस्तान मुव्हमेंट’ केली आहे.

ऑक्टोबर महिन्यात पॅरिसमध्ये ‘एफएटीएफ‘ची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पाकिस्तानचे भवितव्य अवलंबून आहे. कारण यावेळी पाकिस्तानचा समावेश ‘फायनान्शियल अँक्शन टास्क फोर्स’कडून (एफएटीएफ) काळ्या यादीत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तसे झाले, तर पाकिस्तानला इतर देश आणि वित्तसंस्थांकडून कर्ज घेणे कठीण होईल. त्यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

‘एफएटीएफ’च्या काळ्या यादीचे हे संकट टाळण्यासाठी पाकिस्तान सध्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करीत असल्याचा दिखावा करण्यात गुंतला आहे. गेल्याच आठवड्यात पाकिस्तानने ८८ दहशतवाद्यांवर निर्बंध लादले होते. प्रत्यक्षात पाकिस्तानात दाऊद इब्राहिम, रियाझ भटकळसह २१ दहशतवाद्यांना ‘व्हीआयपी’ वागणूक देत असल्याचे समोर आले आहे. यातले बरेचसे दहशतवादी भारतासाठी ‘मोस्ट वॉटेन्ड’ आहेत. हे वृत्त अहवाल बाहेर येत असतानाच पाकिस्तानातूनच पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

स्वतंत्र बलोचिस्तानची मागणी करणाऱ्या ‘फ्री बलोचिस्तान मुव्हमेंट’ने ही मागणी केली आहे. बोलीची नागरिकांवर अत्याचार करणाऱ्या, अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आणि येथे दहशतवाद माजविणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई व्हायला हवी, असे ‘फ्री बलोचिस्तान मुव्हमेंट’ने म्हटले आहे. पाकिस्तानचे लष्कर बलोचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तनुवालामध्ये शांततेत सुरु आंदोलनेही मोडीत काढीत असल्याचे ‘एफबीएम’चे प्रवक्ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या लष्कराने शांततेत सुरु असलेल्या बलोच, सिंधीच्या आंदोलनावर कारवाई केली होती. यात अनेकजण जखमी झाले होते. याचे व्हिडिओज् सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानमधल्या या धार्मिक हिंसाचाराकडे ‘एफएटीएफ’ने लक्ष द्यावे आणि पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याचे आवाहन या संघटनेने केले. पाकिस्तानच्या लष्कराने बलोचिस्तानचा सागरी किनारा आणि अफगाणिस्ताननजिक सीमारेषा ‘अफू ट्रेड कॉरिडॉर’ बनविला आहे. इथून अफूची तस्करी केली जात असल्याचा आरोप या प्रवक्त्याने केला.

leave a reply