जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितासह तिघा जणांची हत्या

- बांदिपोरातून सहा दहशतवाद्यांना अटक

काश्मिरी पंडितश्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी तीन तासात तीन सामान्य नागरिकांच्या हत्या केल्या आहेत. यामध्ये काश्मिरी पंडित असलेल्या एका मेडिकल दुकानाच्या मालकाचा समावेश आहे. तसेच एका श्रीनगरच्या लालबाजार क्षेत्रात एका खाद्यपदार्थ विकणार्‍या एका परराज्यातील एक स्थलांतरिताची हत्या करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांच्या कारवाईने दहशतवादी संघटना हताश झाल्या आहेत आणि या निराशेतूनच सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा दावा केला जातो. तसेच ९०च्या दशकात विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. मात्र काश्मिरी पंडित पुन्हा खोर्‍यात परतू नयेत यासाठी त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जम्मू-काश्मिरच्या श्रीनगरमध्ये हरी सिंग स्ट्रीटवर इकबाल पार्कजवळ असलेल्या एका मेडिकल दुकानात घुसून दहशतवाद्यांनी या दुकानाचे मालक माखन लाल बिंदरू यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. या घटनेच्या एका तासानंतर श्रीनगरच्या लाल बाजार परिसरात रस्त्याच्या कडेला पाणीपुरी विकणार्‍या विरेंद्र पासवान या नागरिकाची हत्या केली. तसेच त्यानंतर काही मिनिटातच उत्तर काश्मिरच्या बांदिपोरामध्येही मोहम्मद शफी लोन नावाच्या टॅक्सी चालकाची हत्या केली. मंगळवारी अवघ्या तीन तासात या तीन हत्या झाल्या. या तिन्ही हत्येची जबाबदारी लश्कर-ए-तोयबाचेच नाव बदललेले रुप असलेल्या ‘द रजिस्टंट फ्रन्ट’ (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे. टीआरएफच्या उमर वाणीने यापुढेही अशा हत्या होतील, अशी धमकी दिली आहे.

दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेल्या माखन लाल बिंदरू यांनी १९९० च्या दशकात दहशतवादाने शिखर गाठले असताना व हजारो काश्मिरी पंडित येथून पलायन करत असतानाही जम्मू-काश्मिरमध्ये राहण्याचा निर्धार केला होता. इतक्या वर्षात बिंदरू याच्या जम्मू-काश्मिरमध्ये कित्येक दहशतवादी हल्ले होताना पाहिले. मात्र न डगमगता ते आपले मेडिकल येथे चालवत होते. त्यांचा मुलगा डॉक्टर असून याच मेडिकलच्या पहिल्या मजल्यावर क्लिनिक चालवतो. तर मुलगी प्राध्यापिका आहे.

पित्याच्या हत्येनंतर माखन लाल बिंदरू यांची मुलगी डॉ. समृद्धी बिंदरू यांनी दहशतवाद्यांना आव्हान दिले आहे. ‘माझ्या वडिलांना गोळ्या झाडणार्‍याने माझ्यासमोर यावे. माझ्या वडीलांना मला शिक्षण देऊन, त्या शिक्षणाची ताकद दिली आहे आणि तुमच्या मागून राजकारण करणार्‍यांनी तुमच्या हाती बंदूका आणि दगड दिले आहेत. तुमचा वापर केला जात आहे. द्वेष, दगडफेक आणि बंदूकाच्या सहाय्याने जिवन जगता येत नाही’, असा संदेश समृद्धी यांनी दहशतवाद्यांना दिला.

‘आपण येथे शून्यातून सुरूवात केली. माझ्या वडीलांचा प्रवास सायकलपासून सुरू झाला. मी सहाय्यक प्रोफेसर झाले. माझा भाऊ प्रसिद्ध डायबेटोलॉजिस्ट झाला. माझी आई दुकान संभाळते. हे माझ्या वडीलांना करून दाखविले, असे सांगून समृद्धी यांनी दहशतवाद्यांना पुढे या आणि शिक्षणाने सामना करा, वादविविदात जिंका’, असे आव्हान समृद्धी यांनी दिले.

दोन वर्षांपूर्वी सरकारने जम्मू-काश्मिरमधून ३७० कलम हटविले. यानंतर येथे अराजक व हिंसा माजेल अशी अपेक्षा पाकिस्तान व दहशतवादी संघटनांना होती. मात्र सुरक्षादलांच्या कारवाईमुळे काश्मीर शांत राहिले, तर दहशतवादी संघटनांना जबरदस्त हादरे बसले. यानंतर सरकारने केलेल्या काही तरतूदींमुळे जम्मू-काश्मीरच्या बाहेरील असलेल्या, पण येथे कित्येक वर्ष रहात असलेल्यांनाही जम्मू-काश्मीरचा रहिवाशी दाखला व जमिन खरेदी करण्याची परवानगी मिळू लागली. सरकारने जम्मू-काश्मीरमधून पलायन केलेल्या काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करण्याची, तसेच त्यांनी मागे सोडलेल्या त्यांच्या मालमत्ता परत मिळवून देण्याचे काम सरकारने सुरू केले आहे. यामुळे पाकिस्तानी दहशतवादी संघटना अस्वस्थ झाल्या आहेत. म्हणूनच काश्मिरी पंडित व इतर राज्यांतून येणारे मजूरांना, ट्रक चालकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात आहे आणि त्यांच्यामध्ये दहशत निर्माण केली जात आहे, असा दावा विश्‍लेषक करीत आहेत.

दरम्यान, या हत्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात जोरदार निदर्शने झाली. पाकिस्तानविरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. तसेच सर्वच स्तरातून या हत्यांची निंदा करण्यात आली. सुरक्षादलांनी या हत्यांनंतर कारवाई करत बांदिपोरामधून ‘लश्कर-ए-तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे.

जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून सुरक्षेचा आढावा
जम्मू-काश्मीरमध्ये एका दिवसात झालेल्या तीन हत्यानंतर जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल यांनी येथील सुरक्षेचा आढवा घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा लवकरच जम्मू-काश्मीर दौर्‍यावर जाणार असल्याचे वृत्त आहे. ३७० कलम हटविल्यानंतर गृहमंत्री शहा यांनी जम्मू-काश्मीरचा दौरा केला होता, त्यानंतर दोन वर्षात त्यांचा हा पहिला दौरा ठरणार आहे. या पार्श्‍वभूमीवरही प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे.

leave a reply