इराणकडून प्रशिक्षण घेतलेले दहशतवादी ड्रोनद्वारे ९/११ सारखे घातपात घडवतील

- इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांचा इशारा

जेरूसलेम – येमेन, इराक, सिरिया आणि लेबेनॉनमधील हजारो दहशतवाद्यांना इराण ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण देत आहे. तर गाझापट्टीतील हमास, इस्लामिक जिहाद या दहशतवाद्यांना इराण याचे तंत्रज्ञान पुरविण्याच्या तयारीत आहे. इराणच्या हवाईतळावर हे प्रशिक्षण दिले जात असून हा तळ हवाई दहशतवादी हल्ल्यांमध्ये धोकादायक ठरू शकतो’, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला. त्याचबरोबर विमानाचे अपहरण न करता, ड्रोन्सच्या सहाय्याने ९/११ सारखा दहशतवादी हल्ला केला जाऊ शकतो, या धोक्याकडे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी लक्ष वेधले.

रिशमन विद्यापीठात आयोजित केलेल्या दहशतवादविरोधी परिषदेत बोलताना इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी इराण अतिशय धोकादायक हालचाली करीत असल्याचा आरोप केला. ‘आखाती देशांमध्ये तयार केलेल्या छुप्या दहशतवादी संघटनांच्या सहाय्याने इराण आपले आर्थिक, राजनैतिक आणि लष्करी उद्दिष्टे गाठण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी इराण वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करीत असून ड्रोन्सचा वापर यापैकी एक पर्याय ठरतो’, असा दावा संरक्षणमंत्री गांत्झ यांनी केला.

येमेन, इराक, सिरिया आणि लेबेनॉनमधील आपल्या हजारो दहशतवाद्यांना इराण हजारो किलोमीटर प्रवास करणारे ड्रोन्स हाताळण्याचे प्रशिक्षण देत आहे. यासाठी मध्य इराणमधील इस्फाहन या लष्करी हवाईतळाचा वापर होत आहे. आखातात हवाई दहशतवाद पसरविण्यामध्ये इराणचा हा तळ धोकादायक बनला आहे, असा इशारा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला. या हवाईतळावरील ‘ड्रोन बेस’चे फोटोग्राफ्स समोर आले आहेत.

‘अमेरिकेवर झालेल्या ९/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर, गेल्या वीस वर्षांमध्ये दहशतवादी हल्ल्यांची पद्धत बदलली आहे. छोट्या दहशतवादी गटांपासून ते दहशतवाद्यांच्या मोठ्या संघटना या लेबेनॉन आणि अफगाणिस्तानसारख्या देशांमधील अस्थैर्याचा गैरफायदा घेतात. येत्या काळात कमकुवत नेतृत्व आणि अधोगतीला जाणारे देश अशा दहशतवादी संघटनांचे तळ ठरतील’, असे गांत्झ यांनी बजावले.

इराणकडून प्रशिक्षण घेतलेले दहशतवादी स्फोटकांनी सज्ज ड्रोन्सचा वापर करून ९/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला घडवू शकतात. यासाठी विमानाचे अपहरण करण्याची आवश्यकताही उरणार नाही, याची जाणीव गांत्झ यांनी करून दिली. म्हणूनच दहशतवादविरोधी लढ्यात, गोपनीय यंत्रणा व हल्ले चढविण्याची क्षमता विकसित करून मुख्य व्यक्तींना लक्ष्य करण्याचे कार्य करीतच रहावे लागेल, असे संरक्षणमंत्री गांत्झ पुढे म्हणाले.

महिन्याभरापूर्वी ओमानच्या सागरी क्षेत्रात इस्रायली इंधनवाहू टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यामागे इराणच असल्याचा आरोप इस्रायलने केला होता. तर दोन दिवसांपूर्वी, शनिवारी इराकच्या इरबिल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ल्यासाठी आलेले दोन इराणी ड्रोन्स पाडल्याचा दावा अमेरिकेच्या लष्कराने केला. यानंतर पुढच्या काही तासात इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी इराणच्या ड्रोन्सच्या तळाबाबत माहिती जाहीर करून ९/११च्या हल्ल्याबाबत दिलेला इशारा लक्षवेधी ठरतो.

leave a reply