रशियाकडून ‘एबीएम’ इंटरसेप्टरची चाचणी

मॉस्को – रशियाच्या एरोस्पेस फोर्सने अँटी-बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (एबीएम) यंत्रणेच्या नव्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. सेकंदाला तीन किलोमीटर वेगाने प्रवास करणारे हे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र शत्रूची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे सहज नष्ट करू शकते, अशी माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली. कझाकस्तानच्या सारी-शगान तळावरुन ही चाचणी घेण्यात आली. रशियन एरोस्पेस फोर्सच्या अंतर्गत येणार्‍या या एबीएम इंटरसेप्टर क्षेपणास्त्राचा वापर अवकाशातून होणारे हल्ले रोखण्यासाठी होईल, असा दावा रशियन माध्यमे करीत आहेत.

रशियाच्या एरोस्पेस फोर्सच्या एबीएम डिफेन्स फॉर्मेशन विभागाचे प्रमुख मेजर सर्जेई ग्रॅब्चक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर नवे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र वेग आणि अचूकतेच्या आघाडीवर यशस्वी ठरले. इंटरसेप्टर क्षेपणास्त्राने या चाचणीत हवेतील लक्ष्य यशस्वीरित्या भेदले. या इंटरसेप्टर क्षेपणास्त्रामुळे रशियाच्या एबीएम क्षमतेत वाढ होईल, असे मेजर ग्रॅब्चक यांनी काही दिवसांपूर्वी रशियन लष्कराशी संलग्न असलेल्या वर्तमानपत्राशी बोलताना म्हटले होते. कॅलेशनिकोव्ह रायफलमधून मारा करणार्‍या गोळीच्या चारपट वेगाने सदर इंटरसेप्टर प्रवास करते असे मेजर ग्रॅब्चक यांनी सांगितले होते.

रशियाच्या या एबीएम इंटरसेप्टर क्षेपणास्त्राच्या चाचणीवर ब्रिटिश माध्यमांनी वेगवेगळे दावे केले आहेत. अमेरिकेच्या ‘स्पेस मिसाईल्स’ नष्ट करण्यासाठी रशियाने इंटरसेप्टरची चाचणी घेतल्याचा दावा ब्रिटिश माध्यमे करीत आहेत. या इंटरसेप्टरमुळे अमेरिकेच्या अंतराळातील हितसंबंधाना धोका निर्माण झाल्याचे या माध्यमांचे म्हणणे आहे. अमेरिकेने रशियाच्या या चाचणीवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

leave a reply