अमेरिकी नौदलाकडून स्वार्म ड्रोन्सची चाचणी

स्वार्म ड्रोन्सवॉशिंग्टन – अमेरिकेच्या नौदलाने कॅलिफोर्नियाच्या किनार्‍याजवळ असलेली विनाशिका स्वार्म ड्रोन्सने नष्ट केली. हा अमेरिकेच्या स्वार्म ड्रोन्सच्या चाचणीचा भाग होता आणि अमेरिकेने केलेली ही चाचणी चीनला इशारा देण्यासाठीच होती, असे अमेरिकेतील आघाडीचे मासिक ‘फोर्ब्स’ने म्हटले आहे.

साधारण आठवड्याभरापूर्वी अमेरिकेच्या नौदलाने ही चाचणी केली होती. स्वार्म ड्रोन्सची क्षमता तपासण्यासाठी, इतर यंत्रणांच्या बरोबरीने स्वार्म ड्रोन्स कसे काम करतात, त्याची नोंद करण्यासाठी ही चाचणी केल्याचे अमेरिकन नौदलाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले होते. या चाचणीसाठी कोणत्या कंपनीचे ड्रोन्स वापरले, याचे तपशील अमेरिकी नौदलाने जाहीर केले नाही. पण रेथॉन कंपनीच्या ‘कोयोटे’ या स्वार्म ड्रोनचा यासाठी वापर झाल्याचा दावा अमेरिकेतील मासिकाने केला आहे.

कोयोटे ड्रोन्सचा वापर स्फोटके वाहून नेण्यासाठी त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक युद्धासाठी देखील केला जाऊ शकतो. याआधी नौदलाच्या ‘लोकोस्ट’ अर्थात ‘लो-कॉस्ट युएव्ही स्वार्मिंग टेक्नॉलॉजी’ या मोहिमेअंतर्गत सुमारे ५० कोयोटे स्वार्म ड्रोन्सची चाचणी करण्यात आली होती. मात्र स्वार्म ड्रोन्सद्वारे विनाशिका नष्ट करून अमेरिकेने आपल्याकडे अतिप्रगत तंत्रज्ञान आहे, याची जाणीव चीन व रशियासारख्या प्रतिस्पर्धी देशांना करून दिल्याचे दिसते.

दरम्यान, ईस्ट आणि साऊथ चायना सी, तसेच तैवानच्या आखातावर पूर्ण वर्चस्व मिळविण्यासाठी चीन ‘अँटी एक्सेस/एरिया डिनायल’ अर्थात ‘ए२/एडी’ युद्धतंत्रावर काम करीत आहे. अमेरिका आणि मित्रदेशांना थोपविण्यासाठी चीनने तीन पदरी व्यूहरचना केलेली आहे. यामध्ये चीनच्या किनारपट्टीपासून २७० सागरी मैल अंतरापर्यंतच्या ईस्ट व साऊथ चायना सीच्या क्षेत्रातील बेटांचा समावेश करण्यात आला आहे. या क्षेत्रातील कृत्रिम बेटांच्या सुरक्षेसाठी चीनने विनाशिकाभेदी क्रूझ् क्षेपणास्त्रे, तसेच जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, गस्तीनौका सज्ज ठेवल्या आहेत.

२७० ते ५४० सागरी मैल अंतरातील हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी लढाऊ विमाने आणि पाणबुड्यांचा वापर करण्याची तयारी चीनने ठेवलेली आहे. तर ५४० सागरी मैलाच्या पलिकडील सागरी क्षेत्रातील युद्धासाठी अर्थात गुआमपर्यंत धडक मारण्यासाठी बॉम्बर विमाने तसेच डीएफ-२६ युद्धनौकाभेदी क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची योजना चीनने आखली आहे.

चीनच्या या ए२/एडी व्यूहरचनेला हादरे देण्याची क्षमता आपल्याकडे आहे, हे अमेरिकेने स्वार्म ड्रोन्सच्या चाचणीद्वारे दाखवून दिले आहे. म्हणूनच या चाचणीला फार मोठे सामरिक महत्त्व आले असून ही चाचणी चीनला आपल्या डावपेचांवर फेरविचार करण्यास भाग पाडेल, असे दिसू लागले आहे.

leave a reply