महाराष्ट्रात दररोज ५०० मुलांना कोरोनाची लागण

- राज्य सरकार बालरोगतज्ज्ञांची टास्कफोर्स स्थापन करणार

कोरोनाची लागणमुंबई – देशात दुसर्‍या लाटेचा सर्वाधिक उद्रेक महाराष्ट्रात झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रुग्णसंख्येत किंचीत घट झाली असली, तरी देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातच आढळत आहेत. लहान मुलांनाही मोठ्याप्रमाणावर संसर्ग होत असल्याचे लक्षात आले आहे. पहिल्या लाटेत लहान मुलांना संसर्गाच्या फारशा घटना घडल्या नव्हत्या. मात्र नव्या लाटेत दरदिवशी चाचण्यांमध्ये ५०० कोरोनाबिधीत मुले सापडत आहेत. तिसर्‍या लाटेमध्ये आणखी मुले बाधित होतील, अशी भीती व्यक्त केली जाते. यामुळे राज्या सरकारने बालरोगतज्ज्ञांची टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय घेतल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

Advertisement

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ४ लाख ८१ हजार ३४६ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १ लाख ४७ हजार मुले हे १ ते १० वर्ष वयोगटातील आहेत. तसेच ११ ते २० वर्ष वयोगटातील ३ लाख ३३ हजार ९२६ मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे १ ते १० वर्षाची ७५ हजार कोरोनाबाधित मुले गेल्या दोन महिन्यात आढळली आहेत.

पहिल्या लाटेनंतर संक्रमण कमी झाले. यानंतर काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, तसेच मुले खेळण्यासाठी घराबाहेर पडली. त्यामुळे मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले. तसेच घराबाहेर पडणार्‍या कुटुंबातील कोरोनाबाधीत व्यक्तींच्या संपर्कात आल्याने किंवा त्यांच्याद्वारे कोरोनाचा विषाणू मुलांपर्यंत पोहोचल्याने मुंलामध्ये संसर्ग वाढत असल्याचा दावा करण्यात येतो. आरोग्य विभागाने जाहीर केलेली आकडेवारी पाहता राज्यात दरदिवशी ५०० मुले कोरोना संक्रमित आढळत आहेत.

मुलांमध्ये हे सक्रमण सर्वाधिक मुंबईत दिसून आले आहे. राज्यातील इतर भागाच्या तुलनेत मुंबईत सुमारे दीड ते दोन टक्के जास़्त मुले कोरोना संक्रमित झाली आहेत. यातील काही मुले दगावलीही आहेत. त्यामध्ये आता तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेपेक्षा तिसर्‍या लाटेत मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक पसरण्याचा धोका वारंवार व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्‍वभूमीवर तिसर्‍या लाट येण्याआधीच उपययोजना आखण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट सरकारने तिसर्‍या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचा वाढलेला धोका लक्षात घेता बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स अर्थात कृतीदल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांसाठी व्हेंटिलेटर्स, आयसीयू बेडची सुविधा वाढविण्याकडेही लक्ष देण्यात येणार आहे. यासंदर्भात काही बालरोग तज्ज्ञांशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संवाद साधल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

leave a reply