जागतिक अर्थव्यवस्थेत होणारी घसरण चिंताजनक

नाणेनिधी, वर्ल्ड बँक व इतर वित्तसंस्थांनी लक्ष वेधले

global economy is worrisomeबीजिंग- जागतिक अर्थव्यवस्थेत होणारी घसरण पुढील काही काळ चालू राहण्याचे संकेत मिळत आहेत. ही बाब अतिशय चिंताजनक आहे, अशा शब्दात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने संभाव्य आर्थिक मंदीबाबत इशारा दिला. नाणेनिधीच्या या वक्तव्याला वर्ल्ड बँक, जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) व ‘ओईसीडी’ या गटानेही दुजोरा दिला आहे. आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्ज्‌‍’नेही नव्या अहवालात, 2023 साली जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर 1.4 टक्क्यांपर्यंत घसरलेला असेल, असे भाकित वर्तविले.

weo-map-social-oct-2022चीनमध्ये नुकतीच ‘1 प्लस 6’ या चौकटीचा भाग असणारी एक बैठक पार पडली. यात चीनमधील वरिष्ठ नेते व अधिकाऱ्यांसह जगातील सहा प्रमुख आर्थिक संस्थांचे प्रमुख उपस्थित होते. यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक, ओईसीडी, डब्ल्यूटीओ, फायनान्शिअल स्टॅबिलिटी बोर्ड व इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांचा समावेश होता. या सर्व संस्थांच्या प्रमुखांनी जागतिक अर्थव्यवस्थेबाबत तीव्र चिंता व्यक्त करताना चीनच्या मंदावणाऱ्या गतीकडेही लक्ष वेधले.

कोरोनाच्या साथीत लादण्यात आलेले निर्बंध व इतर निर्णयांमुळे चीनमध्ये पडझड झाली असून त्याचे परिणाम जागतिक पातळीवरही दिसून येत आहे. चीनच्या उत्पादन तसेच व्यापाराला मोठा फटका बसला असून त्यामुळे जागतिक पुरवठा साखळी मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याने या देशातील बिघडलेल्या स्थितीचे धक्के जागतिक अर्थव्यवस्थेला बसत आहेत.

global economyजागतिक अर्थसंस्थांच्या प्रमुखांनी चीनमधील घसरणीचा उल्लेख करून पुढील काळात त्यात बदल होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. चीनच्या राजवटीने याची योग्य दखल घ्यावी, असे आवाहनही जागतिक संस्थांच्या प्रमुखांनी केले. याबाबत भूमिका अधिक विस्ताराने मांडताना नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तालिना जॉर्जिव्हा यांनी आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य चिंताजनक असल्याचा दावा केला. जगाच्या विविध क्षेत्रांमधून यासंदर्भात संकेत मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. नाणेनिधीने आपल्या अहवालात, 2023 साली आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था 2.7 टक्के दराने प्रगती करील, असे भाकित केले आहे. त्यात अजून घट होऊ शकते, अशी भीती जॉर्जिव्हा यांनी व्यक्त केली.

वर्ल्ड बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या दिशेने प्रवास करीत असल्याची चिंता व्यक्त केली. तर ‘डब्ल्यूटीओ’ने आंतरराष्ट्रीय व्यापारासमोर अभूतपूर्व आव्हाने उभी असून व्यापारातील वाढ जवळपास ठप्प झाली असल्याकडे लक्ष वेधले.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील वरिष्ठ अर्थतज्ज्ञ मोहम्मद अल-एरिअन यांनी जागतिक अर्थव्यवस्थेच्या संरचनेत मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत, असे बजावले होते. तर ‘ओईसीडी’ या गटान जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसणार असल्याची जाणीव करून देणारा अहवाल सादर केला होता.

leave a reply