नायजेरियामध्ये बोको हरामने आयएसच्या कुटुंबियांवर सूड उगवला

isisअबूजा – आफ्रिकेतील नायजेरिया हा देश बोको हराम आणि आयएस या दोन दहशतवादी संघटनांमधील संघर्षाचे केंद्र ठरत आहे. काही दिवसांपूर्वी आयएसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बोको हरामचा मोठा कमांडर ठार झाला होता. याचा सूड घेण्यासाठी बोको हरामने आयएस दहशतवाद्यांच्या पत्नींची हत्या घडविल्याची घटना समोर आली आहे. बोको हरामच्या दहशतवाद्यांनी आयएससाठी काम करणाऱ्या दहशतवाद्यांच्या 33 पत्नींची निर्घृण हत्या घडवून आणली. यामुळे नायजेरियात बोको हराम आणि आयएसमधील संघर्ष तीव्र होण्याची चिंता व्यक्त केली जाते. बोको हराम ही दहशतवादी संघटना गेल्या 20 वर्षांपासून चाड, नायजेरिया, नायजर, कॅमेरुन या आफ्रिकी देशांमध्ये दहशत निर्माण करून आहे. नायजेरियातील सरकार उलथून येथे आपली राजवट प्रस्थापित करण्यासाठी बोको हराम गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. 2015 साली आखाती देशांमध्ये आयएस ही दहशतवादी संघटना हत्याकांड घडवित असताना बोको हराममधून बाहेर पडलेल्या दहशतवाद्यांनी देखील आफ्रिकेतील आयएस उभारली होती. त्यानंतरच्या काळात आफ्रिकेतील boko haram isisआयएस आणि बोको हराममध्ये संघर्ष सुरू झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून बोको हराम आणि आयएसमध्ये संघर्षबंदी घडविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. पण आठवड्याभरापूर्वी आयएसच्या दहशतवाद्यांनी बोको हरामचा वरिष्ठ कमांडर मलम अबूबकर आणि 12 हून अधिक दहशतवाद्यांचा खातमा केला. यानंतर या दोन्ही दहशतवादी संघटनांमधील संघर्षबंदी संपुष्टात आल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती. शुक्रवारी बोको हरामचा नेता अली नुल्डे याने नायजेरियाच्या संबिसा जंगलात हल्ले चढविण्याची सूचना देऊन संघर्षबंदीबाबतची चर्चा निकालात काढली. संबिसाच्या जंगलात राहणाऱ्या आयएसशी जोडलेल्या 33 जणींची बोको हरामच्या दहशतवाद्यांनी हत्या घडविली. यापुढेही आयएसचे दहशतवादी व त्यांच्या कुटुंबियांवरील हल्ले सुरू राहतील, अशी धमकी बोको हरामने दिली. तर आयएसने देखील बोको हरामच्या नेत्यांना लक्ष्य केले जाईल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे नायजेरियामध्ये दोन दहशतवादी संघटनात मोठा संघर्ष भडकण्याची शक्यता बळावली आहे.

leave a reply