चीनला बसलेल्या आर्थिक धक्क्यांचा जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसेल

- विश्‍लेषकांचा दावा

अर्थव्यवस्थेला फटकाबीजिंग – चीनच्या अर्थव्यवस्थेला एकापाठोपाठ बसत असलेल्या धक्क्यांमुळे कोरोना साथीनंतर पूर्वपदावर येणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा फटका बसेल, असा दावा विश्‍लेषकांनी केला आहे. चीनच्या सरकारी यंत्रणांनी नुकतीच जुलै महिन्याची आर्थिक आकडेवारी जाहीर केली असून औद्योगिक उत्पादन, रिटेल सेल्स, ई-कॉमर्स व गुंतवणूक या क्षेत्रांची गती मंदावल्याचे समोर आले आहे. चीनच्या या आकडेवारीनंतर आशियाई शेअरबाजारांमध्ये घसरण झाली असून, कच्च्या तेलाचे दरही घसरले आहेत. गेल्याच आठवड्यात ‘जेपी मॉर्गन’ या आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेने नव्या तिमाहीतील चीनचा विकासदर दोन टक्क्यांपर्यंत घसरण्याचे भाकित वर्तविले होते.

गेल्या वर्षी कोरोनाची साथ तीव्र असताना अनेक आघाडीच्या अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसला होता. अमेरिका व युरोपिय देशांसह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांनी नकारात्मक विकासदर नोंदविला होता. त्याचवेळी चीनने मात्र आपल्या अर्थव्यवस्थेने दोन टक्क्यांहून अधिक गतीने प्रगती केल्याची माहिती दिली होती. त्यामुळे या वर्षात चीनची अर्थव्यवस्था चांगला विकासदर नोंदवेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण हेनान प्रांतात झालेली अतिवृष्टी आणि ‘डेल्टा व्हेरिअंट’ची नवी साथ या पार्श्‍वभूमीवर चीनची आर्थिक गती पुन्हा एकदा मंदावण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे.

दुसऱ्या तिमाहिच्या पहिल्या टप्प्यातच चीनच्या घसरणीचे संकेत मिळण्यास सुरुवात झाली होती. एप्रिल महिन्यात चीनमधील औद्योगिक उत्पादन, रिटेल सेल्स, कंपन्यांचा नफा या गोष्टीत मोठी घट झाल्याची माहिती समोर आली होती. त्याचवेळी चिनी कंपन्यांकडून कर्जाची परतफेड न करण्याचे प्रमाण वाढल्याचेही उघड झाले होते. ‘ब्लूमबर्ग’ने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या चार महिन्यात चिनी कंपन्यांनी तब्बल 18 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड केलेली नव्हती. चीनच्या अर्थव्यवस्थेला बसणारे हे धक्के पुढे कायम राहिल्याचे जुलै महिन्याच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

जुलै महिन्यातील रिटेल सेल्स चार टक्क्यांनी घसरून साडेआठ टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. जून महिन्यानंतर औद्योगिक उत्पादनात एक टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत गुंतवणुकीतही एक टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. ई-कॉमर्स क्षेत्रालाही मोठा धक्का बसला असून त्याच्या वाढीचा दर पाच टक्क्यांखाली आला आहे. गेली पाच वर्षे हा दर सरासरी 20 टक्क्यांहून अधिक होता. चीनच्या ‘नॅशनल स्टॅटिस्टिक्स ब्युरो’ने घसरणीची कारणे सांगताना पूर व कोरोना साथीबरोबरच बाह्य क्षेत्रात वाढती अनिश्‍चितता यांचा उल्लेख केला आहे. त्याचवेळी अर्थव्यवस्थेची गती अस्थिर व असंतुलित राहिल, असे बजावले आहे.

‘कोरोनाच्या नव्या साथीमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला बसणारे धक्के कायम राहिले, तर जागतिक अर्थव्यवस्थेच्या गतीलाही त्याचे फटके बसतील. जागतिक पुरवठा साखळीत अडचणी येतील आणि उत्पादनांना असणारी मागणी घटेल’, असा दावा हाँगकाँगमधील अर्थतज्ज्ञ ब्रूस पँग यांनी केला. ‘एएनझेड बँकिंग ग्रुप’चे अर्थतज्ज्ञ रेमंड युंग यांनी, जुलै महिन्यातील आकडेवारी वेगवान घसरणीचे संकेत देणारी असून ऑगस्ट महिन्यातही चिनी अर्थव्यवस्थेची गती मंदावलेली असू शकते, असे बजावले आहे. चीनच्या राजवटीकडून खाजगी कंपन्यांविरोधात सुरू असणारी कारवाईही अर्थव्यवस्थेसाठी मारक ठरण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे गुंतवणुकदारांमध्ये भीतीचे वातावरण असून बाजारपेठेलाही हादरा बसल्याचे विश्‍लेषकांनी यापूर्वीच बजावले आहे.

चीनच्या अर्थव्यवस्थेतील धक्क्यांचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटण्यास सुरुवात झाली आहे. चीनची आकडेवारी समोर आल्यानंतर आशियातील शेअरबाजारात घसरण झाली असून कच्च्या तेलाचे दरही खाली आले आहेत.

leave a reply