अफगाणिस्तानातील अमेरिकन्सच्या सुरक्षेबाबत संरक्षणमंत्री ऑस्टिन यांची धक्कादायक विधाने

- काबुल विमानतळावर येईपर्यंत सुरक्षा देता येणार नसल्याची कबुली

ऑस्टिनवॉशिंग्टन/काबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये असलेल्या अमेरिकी नागरिकांना सुरक्षेबाबत संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी धक्कादायक विधाने केली आहेत. अफगाणिस्तानात अजूनही 15 हजार अमेरिकन्स आहेत. त्या सर्वांनात काबुलमधील विमानतळावर येईपर्यंत सुरक्षा पुरविता येऊ शकत नाही, असे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही अशी माहिती देणारे निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामुळे बायडेन प्रशासनावर सुरू असलेल्या टीकेची धार अधिकच तीव्र झाली आहे.

काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘अमेरिका इज बॅक’ची घोषणा करीत आपली पाठ थोपटून घेतली होती. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत अमेरिकेची पिछेहाट झाल्याचा दावा करीत आपल्या नेतृत्त्वाखाली अमेरिका सर्व धोक्यांचा मुकाबला करेल, अशा स्वरुपाची वक्तव्येही बायडेन यांनी केली होती. मात्र अफगाणिस्तानमधील माघारीच्या मुद्यावर बायडेन प्रशासन सपशेल आपटल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेतील राजकीय वर्तुळासह आंतरराष्ट्रीय माध्यमे व विश्‍लेषकांकडून अमेरिकेचा महासत्ता म्हणून असलेला दबदबा संपल्याची जोरदार टीका होऊ लागली आहे. संरक्षण तसेच परराष्ट्र विभागाकडून आलेली वक्तव्ये त्याचाच भाग दिसत आहेत.

मंगळवारी रात्री अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एक ‘नोट’ प्रसिद्ध करून अफगाणिस्तानमधील अमेरिकी नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर अमेरिकेच्या अफगाणिस्तानमधील दूतावासानेही आपल्या वेबसाईटवर याच स्वरुपाची सूचना ‘सिक्युरिटी ॲलर्ट’ म्हणून प्रसिद्ध केली. त्यानंतर रविवारी अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय ‘पेंटॅगॉन’मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी त्याची उघड कबुली दिली.

ऑस्टिनअफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये तालिबानने जागोजागी चेकपॉर्इंट उभारले असून लोकांना अडवून तपासणी केली जात आहे. काबुलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेरही तालिबानची पथके तैनात असून विमानतळावर जाणाऱ्यांना अडवून जबरदस्तीने माघारी पाठविण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी विमानतळाबाहेर झालेल्या एका घटनेत काही जणांचा बळीही गेला होता. या पार्श्‍वभूमीवर अमेरिका आपल्या नागरिकांना सुरक्षित माघारी आणण्यासाठी काय केले जात आहे, असा सवाल पत्रकारांनी ऑस्टिन यांना विचारला होता. त्यावर उत्तर देताना संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी, अमेरिकी लष्कराकडे अफगाणिस्तानमधील अमेरिकी नागरिकांना माघारी आणण्याची क्षमता नाही, असे सांगून टाकले.

अमेरिकी लष्कर विमानतळाबाहेरच्या भागात तैनात करता येणार नाही, त्यासंदर्भात काहीच बोलणी झालेली नाहीत, अशी कबुलीही संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी दिली. यासंदर्भात अमेरिका तालिबानशी संवादाचा प्रयत्न करीत असल्याचेही अमेरिकी संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिली यांनी काबुल विमानतळाची सुरक्षा अमेरिकी लष्कराकडे असल्याचे सांगून पाच हजार सैनिक तैनात असल्याचे म्हटले आहे. तालिबानने अमेरिकी लष्कराच्या कामात हस्तक्षेप केलेला नाही, मात्र परिस्थिती स्फोटक असून कधीही बदलू शकते, असा इशाराही जनरल मिली यांनी दिला आहे.

अमेरिकी प्रसारमाध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार, राजधानी काबुलमध्ये जवळपास 10 हजारांहून अधिक अमेरिकी नागरिक अडकले आहेत. अमेरिकेला सहकार्य करणाऱ्या तसेच स्वयंसेवी संस्था व इतर गटांशी निगडीत लोकांचा विचार केला तर अफगाणिस्तानमधील जवळपास एक लाख जण अमेरिकेत आश्रयासाठी येऊ शकतात, असे मानले जाते. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकी संरक्षणमंत्र्यांची कबुली लक्ष वेधून घेणारी ठरते. परराष्ट्र विभाग तसेच संरक्षणमंत्र्यांच्या निवेदनांनंतर अमेरिकी संसद सदस्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटत असून बायडेन प्रशासनाला धारेवर धरण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते केव्हिन मॅक्कार्थी यांनी बायडेन प्रशासनाचे धोरण अनाकलनीय असल्याचा टोला लगावला आहे.

leave a reply