इराणमधील निदर्शनांची धार अधिकच वाढली

तेहरान – इराणची राजधानी तेहरानपासून सुमारे ५०० किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या झाहेदान शहरात निदर्शक आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. इराणच्या यंत्रणांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही, पण याचे व्हिडिओज्‌‍ प्रसिद्ध झाले असून यात गोळीबाराचे आवाज स्पष्टपणे ऐकू येतात. यामुळे हिजाबसक्तीच्या विरोधात सुरू झालेल्या इराणमधील आंदोलनाला देशव्यापी प्रतिसाद मिळत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. इराणच्या सुमारे १२५ शहरांमध्ये निदर्शने झाली असून आत्तापर्यंत यात २७० जणांचा बळी गेला आहे. तर इराणच्या यंत्रणेने अटक केलेल्या निदर्शकांची संख्या १४ हजारांच्याही पुढे गेली आहे. मात्र इराणचे सरकार अजूनही या निदर्शनांच्या मागे परकीय कारस्थान असल्याचा आरोप करून निदर्शकांवरील कठोर कारवाईचे समर्थन करीत आहे.

intensity of the protestsझाहेदान शहरातील प्रार्थनास्थळाच्या आवारात इराणच्या सुरक्षा यंत्रणा व निदर्शकांमध्ये चकमक झडली. याचे तपशील अद्याप समोर आलेले नसले तरी निदर्शक इराणच्या सुरक्षा यंत्रणेच्या जवानांना भिडल्याचे काही व्हिडिओज्‌‍ प्रसिद्ध झाले आहेत. इराणच्या यंत्रणांनी झाहेदान शहरातील निदर्शने मोडून काढण्यासाठी निर्दयपणे कारवाई केली होती व इथे ३० सप्टेंबर पासून आत्तापर्यंत शंभराहून अधिकजणांचा बळी गेलेला आहे, असा दावा इथले कार्यकर्ते करीत आहेत. त्यांच्या या दाव्याला दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र शुक्रवारच्या घटनेमुळे स्थानिक जनता इराणच्या सुरक्षा यंत्रणेवर संतापल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

झाहेदान शहर इराणच्या बलोचिस्तान प्रांतात असून हा भाग राजधानी तेहरानपासून ५०० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. यामुळे इराणमधील निदर्शनांची व्याप्ती जगासमोर आलेली आहे. आत्तापर्यंत इराणच्या सुमारे १२५ शहरांमध्ये हिजाबसक्तीच्या तसेच इराणच्या राजवटीच्याही विरोधात निदर्शने झाली असून सुरूवातीच्या काळात केवळ मोठी शहरे व विद्यापीठांपर्यंत मर्यादित असलेली निदर्शने आता अधिकाधिक व्यापक व उग्र बनत चालली आहेत. याचे केंद्र इराणच्या विद्यापीठांमध्ये असल्याचा दावा केला जातो व या विद्यापीठांशी निगडीत असलेला सुशिक्षित, बुद्धिमंत वर्ग इराणच्या राजवटीवर संतापलेला आहे. उद्योगक्षेत्र व इतर मोठ्या आस्थापनांमध्ये अधिकारपदावर असलेल्या या वर्गाच्या पाठिंब्यामुळे निदर्शनांची धार अधिकच वाढली आहे.

अशा परिस्थितीत कठोर कारवाई करून निदर्शने मोडून काढण्याच्या इराणी यंत्रणांच्या धोरणावर जळजळीत प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ताब्यात घेतलेल्या निदर्शकांना तसे त्यांच्या कुटुंबियांना इराणच्या यंत्रणांकडून चांगली वागणूक मिळत नसून त्यांच्यावर अन्याय होत असल्याची टीका मानवाधिकार संघटना करीत आहेत. यामुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा सामना इराणच्या राजवटीला करावा लागत आहे. मात्र इराणच्या राजवटीने या निदर्शनांचा संबंध इराणच्या विरोधात परकीय शक्तींनी आखलेल्या कारस्थानाशी जोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. इराणच्या शिराझ शहरातील प्रार्थनास्थळात गोळीबार करून एका दहशतवाद्याने १५ जणांचा बळी घेतला होता. मानवाधिकारांचा पुळका असलेले या दहशतवादी हल्ल्यावर का बोलत नाहीत? असा सवाल इराणच्या यंत्रणांनी केला.

एकाच दिवसापूर्वी इराणचे धर्मगुरू आयातुल्लाह खामेनी यांनी आपल्या देशाच्या विरोधात आखलेल्या या कारस्थानाविरोधात सुरक्षा यंत्रणा, न्यायव्यवस्था व माध्यमसृष्टीतील सर्वांनी एकजूट करावी, असे आवाहन केले होते. त्यामुळे या निदर्शकांच्या मागण्यांवर चर्चा व वाटाघाटी करण्याची शक्यताच इराणच्या राजवटीने निकालात काढल्याचे दिसत आहे. पुढच्या काळात केवळ कारवाईद्वारे ही निदर्शने मोडून काढता येतील असा विश्वास इराणच्या यंत्रणांना वाटत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत.

leave a reply