अमेरिका ‘युनिव्हर्सल जेनेटिकली इंजिनिअर्ड बायोवेपन’ विकसित करीत आहे

रशियन संसदेच्या अहवालातील दावा

मॉस्को/वॉशिंग्टन – केवळ मानवजातच नाही तर प्राणी व पिकांवरही घातक परिणाम होईल, असे ‘युनिव्हर्सल जेनेटिकली इंजिनिअर्ड बायोवेपन’ अमेरिकेकडून विकसित करण्यात येत आहे. शत्रूचे प्रचंड प्रमाणात व कधीही भरून न निघणारे नुकसान व्हावे हा या जैविक शस्त्राच्या निर्मितीमागील उद्देश आहे, असा खळबळजनक दावा रशियन संसदेच्या अहवालात करण्यात आला. अमेरिकेकडून युक्रेनमध्ये चालविण्यात येणाऱ्या जैविक प्रयोगशाळा व त्यातील प्रयोगांचा तपास केल्यानंतर ही माहिती समोर आल्याचे रशियाच्या संसदीय समितीने म्हटले आहे.

Universal Genetically Engineered Biowapanयुक्रेनवर हल्ला केल्यानंतर काही दिवसांनी रशियाने युक्रेनमधील अमेरिकी बायोलॅब्सचा मुद्दा उपस्थित केला होता. अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून युक्रेनमध्ये २६ जैविक प्रयोगशाळा चालविण्यात येतात. यावर अमेरिकेचे थेट नियंत्रण असून कोरोनासह इतर अनेक घातक विषाणूंवर यात प्रयोग सुरू असल्याचे आरोप रशियाने केले होते. युक्रेनमधील जवान तसेच सामान्य नागरिकांवर विषाणूंचे प्रयोग करण्यात येत असल्याचे रशियाने म्हटले आहे.

या प्रयोगशाळांशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन यांचा संबंध असल्याचा दावाही रशियाने केला होता. युक्रेनच्या संसद सदस्यांनी अमेरिकी प्रयोगशाळांवर आक्षेप घेतल्याचेही रशियाने निदर्शनास आणून दिले होते. यासंदर्भातील माहिती तसेच पुरावे आंतरराष्ट्रीय यंत्रणांसमोर तसेच विविध बैठकांमध्ये सादरही करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जीनिव्हात ‘बायोलॉजिकल वेपन्स कन्व्हेंशन’ची बैठक झाली होती. त्यात रशियाने अनेक पुरावे सादर करताना अमेरिका व युक्रेनकडून देण्यात येणाऱ्या माहितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

मात्र युक्रेन व अमेरिकेने रशियाचे आरोप फेटाळले आहेत. अमेरिकेच्या प्रयोगशाळा कार्यरत असल्या तरी त्यात घातक विषाणू अथवा साथींचे संशोधन होत असल्याचे युक्रेनने नाकारले होते. अमेरिकेने यासंदर्भात कबुली दिली असली तरी जैविक शस्त्रांच्या निर्मितीसंदर्भातील दावे फेटाळले होते. रशियाकडून देण्यात येणारी माहिती अपप्रचाराचा भाग असल्याचे अमेरिका व युक्रेनने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर रशियाच्या संसदीय समितीने केलेला तपास व त्यातील निष्कर्ष लक्ष वेधून घेणारे ठरतात.

leave a reply