अमेरिका कुठल्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही

- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे इस्रायलला नवे आश्वासन

Iran to be nuclear-armedवॉशिंग्टन/व्हिएन्ना – अमेरिका इराणबरोबर करीत असलेला अणुकरार राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीच आखलेल्या ‘रेड लाईन’ अर्थात मर्यादेचे उल्लंघन करणारा आहे. हा करार इराणला अणुबॉम्बने सज्ज होण्यासाठी सहाय्यक ठरेल, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांनी दिला होता. त्यावर अमेरिका कुठल्याही परिस्थितीत इराणला अणुबॉम्बने सज्ज होऊ देणार नाही, असे आश्वासन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान लॅपिड यांच्याशी झालेल्या चर्चेत दिले आहे. पण त्याने इस्रायलच्या पंतप्रधानांचे समाधान झालेले नाही, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

इराणबरोबरचा अणुकरार अंतिम टप्प्यात पोहोचला असून येत्या काही दिवसात हा करार संपन्न होईल, असा दावा युरोपिय महासंघाचे वरिष्ठ नेते करीत आहेत. या अणुकरारासाठी इराणने अमेरिकेकडे ठोस हमीची मागणी केली आहे. बायडेन प्रशासनाने इराणच्या या मागणीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण याआधीच्या तुलनेत अमेरिका या अणुकराराच्या फारच जवळ पोहोचल्याचा दावा व्हाईट हाऊस करीत आहे.

मात्र हा करार इराणचा अणुकार्यक्रम रोखणार नाही, तर त्याला गती देणारा असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांनी चारच दिवसांपूर्वी असा इशारा दिला होता. त्याचबरोबर इराणबरोबर हा करार करून राष्ट्राध्यक्ष बायडेन आपणच आखलेल्या ‘रेड लाईन’चे उल्लंघन करीत असल्याचे लॅपिड यांनी बजावले होते. इराणबरोबर असा वाईट अणुकरार न करता राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी यातून माघार घ्यावी, असे आवाहनही लॅपिड यांनी केले होते.

nuclear-armedइस्रायलच्या पंतप्रधानांनी केलेल्या या आवाहनाची दखल घेऊन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पंतप्रधान लॅपिड यांच्याशी 45 मिनिटे फोनवरुन चर्चा केली. इराणचा अणुकरार आणि इराणपासून असलेल्या धोक्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा पार पडल्याचा दावा केला जातो. अमेरिका इराणबरोबरचा 2015 सालचा अणुकरार पुनर्जिवित करीत असली तरी इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नसल्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे आश्वासन बायडेन यांनी इस्रायलच्या पंतप्रधानांना दिले.

तसेच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सला दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळण्यात येणार नाही, याबाबतही बायडेन-लॅपिड यांच्यात चर्चा झाल्याचे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे. मात्र बायडेन प्रशासन इराणबरोबर करीत असलेला अणुकरार कुठल्याही परिस्थितीत इस्रायलच्या सुरक्षेसाठी उपकारक ठरणारा नाही, यावर इस्रायल ठाम आहे. त्यामुळे अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी इराणबरोबर अणुकरार केला तरी इस्रायलकडे स्वसंरक्षणाचा अधिकार आहे, याची आठवण पंतप्रधान लॅपिड यांनी करून दिली.

दरम्यान, अमेरिकेबरोबर अणुकरार करण्याच्या तयारीत असलेल्या इराणने नातांझ अणुप्रकल्पातील युरेनियमचे संवर्धन वाढविल्याची चिंता आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने आपल्या नव्या अहवालात व्यक्त केली आहे. अणुऊर्जा आयोगाचा हा अहवाल अमेरिका-इराण अणुकरारावर परिणाम करू शकतो.

leave a reply