तैवानच्या शस्त्रपुरवठ्यावरून चीनचा अमेरिकेला इशारा

China warns USबीजिंग/वॉशिंग्टन – अमेरिकेने तैवानला शस्त्रपुरवठा करणे सुरू ठेवल्यास चीन ठोस व निर्णायक कारवाईद्वारे त्याला प्रत्युत्तर देईल, असा इशारा चीनने दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तैवानसाठी एक अब्ज डॉलर्सहून अधिक किंमतीचा शस्त्रपुरवठा करण्याचा प्रस्ताव आणला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना चीनने हा इशारा दिला. चीन इशारा देत असतानाच तैवाननेही चीनने आपल्या संयमाची कसोटी पाहू नये, अशा शब्दात बजावले आहे.

तैवान हा आपलाच सार्वभौम भूभाग असून इतर कुठल्याही देशाने तैवानबरोबर राजनैतिक व लष्करी सहकार्य प्रस्थापित करू नये, अशी चीनची भूमिका आहे. पण चीनच्या या भूमिकेला काडीचीही किंमत न देता अमेरिकेने तैवानशी व्यापारी, राजनैतिक तसेच संरक्षण पातळीवरील सहकार्य वाढविण्यास सुरुवात केली आहे. सध्या अमेरिका व तैवानमध्ये व्यापारी सहकार्यावर चर्चा सुरू आहे. त्याचवेळी अमेरिकेच्या सभापतींपासून वरिष्ठ संसद सदस्यांचे तैवान दौरेही चालू झाले आहेत.

China-warns-USबायडेन यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिकेने तीनदा तैवानच्या संरक्षणसहाय्याच्या विविध प्रस्तावांना मान्यता दिली होती. पण गेल्या काही दिवसात चीनकडून चालू असलेल्या आक्रमक लष्करी हालचालींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून मांडण्यात येणारा एक अब्ज डॉलर्सचा प्रस्ताव त्याचाच भाग मानला जातो. या प्रस्तावात हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘साईडविंडर’ क्षेपणास्त्रांसह ‘हार्पून मिसाईल्स’ तसेच सर्व्हिलन्स रडारचा समावेश आहे.

Taiwan's arms supplyअमेरिकेच्या या नव्या प्रस्तावावर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. ‘तैवानला करण्यात येणारा शस्त्रपुरवठा अमेरिकेने तातडीने रोखण्याची आवश्यकता आहे. तैवानच्या हद्दीतील तणाव वाढेल, अशी पावले अमेरिकेने उचलू नये. असे झाल्यास आपले सार्वभौमत्व व हितसंबंधांच्या सुरक्षेसाठी चीन ठोस व निर्णायक कारवाई करु शकतो’, असा इशारा अमेरिकेतील चिनी दूतावासाचे प्रवक्ते लिऊ पेंगयु यांनी दिला. अमेरिकेकडून तैवानला करण्यात येणारा शस्त्रपुरवठा तैवानमधील विघटनवाद्यांना सहाय्य करणारा ठरतो, याकडेही चिनी प्रवक्त्यांनी लक्ष वेधले.

दरम्यान, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी चीनला नवा इशारा दिला आहे. ‘तैवान कोणतीही चिथावणी देणार नाही. शत्रूने अधिक भडकविण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही शांतता व संयम राखण्याचा प्रयत्न करू. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही प्रत्युत्तर देणार नाही. तैवानच्या संरक्षणविभागाला आपण यासंदर्भात योग्य आदेश दिले आहेत’, असे राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी बजावले. चीनकडून तैवानच्या हद्दीतील घुसखोरी सातत्याने वाढत असून मंगळवारी २४ लढाऊ विमाने व ११ युद्धनौकांनी तैवानच्या क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती तैवानी संरक्षण विभागाने दिली.

leave a reply