अमेरिका लवकरच इराणला हुकूमशहांपासून मुक्त करील

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन

biden raisiवॉशिंग्टन/तेहरान – ‘इराणची चिंता करू नका, अमेरिका लवकरच इराणला हुकूमशहांपासून मुक्त करील. इराणची जनताच यासाठी पुढाकार घेईल’, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली. गेल्या ४५ दिवसांपासून इराणमध्ये सुरू असलेल्या राजवटविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी ही प्रतिक्रिया दिली. पण बायडेन यांना व्यवस्थित लक्षात राहत नसल्याचा टोला इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी लगावला. ४३ वर्षांपूर्वीच इराण स्वतंत्र झाला असून यापुढे कधीही अमेरिकेच्या ताब्यात जाणार नाही, असे रईसी यांनी बजावले.

इराणने महिला, तरुणी व विद्यार्थीनींवर लादलेल्या हिजाबसक्तीच्या विरोधात जवळपास गेल्या सात आठवड्यांपासून इराणच्या शंभरहून अधिक शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत. इराणमधील वेगवेगळ्या गटांकडून या निदर्शनांना पाठिंबा मिळत आहे. शिक्षक, कर्मचारी, कामगार तसेच व्यापारी, कलाकार, खेळाडू आणि काही नेतेही या निदर्शनांनाच्या समर्थनार्थ उतरले आहेत. अमेरिका व युरोपिय देशांमध्येही इराणच्या राजवटीविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. अशावेळी इराणबरोबर अणुकरारावर वाटाघाटी करणाऱ्या बायडेन प्रशासनाने उघडपणे इराणविरोधात भूमिका स्वीकारलेली नाही, अशी टीका होत आहे.

Protests-Iranगुरुवारी ओशियनसाईड येथील डेमोक्रॅट पक्षाच्या प्रचारसभेत देखील उपस्थित नागरिकांनी बायडेन यांच्यावर इराणविरोधात भूमिका घेण्यासाठी दबाव टाकला. काही नागरिकांनी मोबाईलवर ‘फ्री इराण’चा बॅनर दाखवून बायडेन यांच्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित असल्याची मागणी केली. यावेळी बोलताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मोजक्या शब्दात इराण लवकरच मुक्त होईल, याची काळजी करू नका, असे म्हटले आहे. पण यापलिकडे बायडेन यांनी इराणविरोधात एक शब्दही काढला नाही.

अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या घोषणेला इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी शुक्रवारी प्रत्युत्तर दिले. यामध्ये रईसी यांनी बायडेन यांना स्मृतिभ्रंशाचा आजार असल्याचा टोला लगावला. त्यामुळे आपण काय बोलत आहोत, याचे त्यांनाही कळत नसल्याचे ताशेरे राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी ओढले. तसेच १९७९ सालच्या इस्लामी क्रांतीतच इराण स्वतंत्र झाल्याची आठवण रईसी यांनी करून दिली.

दरम्यान, इराणमधील राजवटविरोधी निदर्शनांची धग वाढत चालली आहे. इराणी सुरक्षा यंत्रणेच्या कैदेत आणखी एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे संतापलेल्या इराणी निदर्शकांनी रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍स व पोलीस जवानांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी स्थानिक धार्मिक नेत्यांवर हल्ले चढविले जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. झाहेदान शहरात निदर्शकांच्या हल्ल्यात धार्मिक नेत्याचा बळी गेल्याचा दावा केला जातो.

leave a reply